Join us

KBCमध्ये सहभागी झाल्यानं अधिकाऱ्याला मोठा आर्थिक फटका; रेल्वेच्या कारवाई संपूर्ण कुटुंब तणावाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:57 PM

कोटा विभागातील अधिकाऱ्याला रेल्वे प्रशासनानं पाठवली चार्जशीट; संपूर्ण कुटुंब तणावात

कोटा: कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोटा विभागातील कार्यालय अधीक्षक देशबंधू पांडे यांच्यावर रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. त्यांना चार्जशीट पाठवण्यात आली आहे. याशिवाय ३ वर्षांसाठी त्यांची पगारवाढ थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनानं केलेल्या कारवाईला कर्मचारी संघटनेनं विरोध केला आहे. पांडे यांच्याविरुद्ध झालेली कारवाई अयोग्य असल्याचं पश्चिम मध्य रेल्वे मजूर संघाचे सचिव अब्दुल खालिद यांनी म्हटलं आहे. मजूर संघ पांडेवर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देईल, असंही खालिद म्हणाले.

केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी कोटा विभागात कार्यरत असलेले देशबंधू पांडे यांनी ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान मुंबईत होते. यासाठी सुट्टी गरजेची होती. त्यासाठीचा अर्ज पांडे यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र त्यांच्या अर्जावर कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सुट्टी मंजूरच झाली नाही. सुट्टी नसताना पांडे केबीसीच्या चित्रीकरणासाठी मुंबईला गेले. पांडेंनी केबीसीमध्ये ३ लाख २० हजार रुपये जिंकले. मात्र ही रक्कम पांडे यांना महागात पडली. रेल्वेनं त्यांचा चार्जशीट पाठवली आहे. पांडे अतिशय घाबरले असून ते या विषयावर भाष्य करायला तयार नाहीत.

केबीसीमध्ये सहभागी होऊन घरी परतलेल्या पांडे यांना १८ ऑगस्टला चार्जशीट पाठवण्यात आली. त्यांची पगारवाढ तीन वर्षांसाठी थांबवण्याचे आदेशही प्रशासनानं दिले. यामुळे केबीसीत ३ लाख २० हजार जिंकणाऱ्या पांडेंच्या आनंदावर विरजण पडलं. रेल्वेनं केलेल्या कारवाईमुळे पांडे आणि त्यांचं कुटुंब तणावाखाली आहे. केबीसीमध्ये सहभागी झाल्यानं त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पगारवाढ रोखण्यात आल्यानं पांडे यांना जवळपास दीड लाख रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे. केबीसीत त्यांनी ३ लाख २० हजार जिंकले. ही रक्कम बक्षिसाची असल्यानं त्यातून कर कापला जाईल.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीरेल्वे