साहित्य संमेलनासाठी केडीएमसीचे ५० लाख

By admin | Published: May 4, 2016 12:29 AM2016-05-04T00:29:21+5:302016-05-04T00:29:21+5:30

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सर्वप्रथम तयारी दाखवणाऱ्या कल्याण सार्वजनिक वाचनालयाबरोबरच डोंबिवलीतील आगरी यूथ फोरम आणि सातारा महाराष्ट्र साहित्य

KDMC 50 lakhs for literature conferences | साहित्य संमेलनासाठी केडीएमसीचे ५० लाख

साहित्य संमेलनासाठी केडीएमसीचे ५० लाख

Next

- मुरलीधर भवार,  कल्याण

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सर्वप्रथम तयारी दाखवणाऱ्या कल्याण सार्वजनिक वाचनालयाबरोबरच डोंबिवलीतील आगरी यूथ फोरम आणि सातारा महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही संमेलन आयोजनाची तयारी दाखवल्याने आयोजनात चुरस निर्माण झाली आहे. मात्र कल्याणच्या मागणीला बळ देण्याकरिता कल्याण- डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी साहित्य संमेलनाकरिता ५० लाख रुपयांची तरतूद केली करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे.
साहित्य संमेलन कल्याणमध्ये आयोजित करण्यासाठी कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे अर्ज केला आहे. त्यांच्या मागणीवर ३० एप्रिलला महामंडळाच्या नागपूर येथील बैठकीत हा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र आता १७ जुलैच्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनाच्या यजमानपदाचा निर्णय होणार आहे. कल्याण वाचनालयानंतर डोंबिवलीच्या आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनीही साहित्य संमेलनाची मागणी केली आहे. हे संमेलन डोंबिवलीत व्हावे असा त्यांचा आग्रह आहे. गतवर्षीही त्यांनी साहित्य संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. कल्याणचे वाचनालय व डोंबिवली आगरी यूथ फोरम या दोन्ही संस्थांनी वेगवेगळी मागणी केली असली तरी कल्याण व डोंबिवली ही एकाच महापालिका क्षेत्रातील शहरे आहेत. संमेलनाची धुरा सांभाळण्यास सार्वजनिक वाचनालय व आगरी यूथ फोरम एकत्र येऊ शकतात. कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात आगरी लोकप्रतिनिधींचा प्रभाव जास्त आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी येणाऱ्या दोन-अडीच कोटींच्या खर्चासाठी आगरी समाजातील व्यावसायिक आर्थिक पाठबळ उभे करु शकतात तर कल्याणचे वाचनालय संमेलनाच्या प्रत्यक्ष आयोजनात सहभाग देऊ शकते.


महापौरांचा पुढाकार
कल्याणमध्ये संमेलन आयोजित करण्याचा निर्णय झाल्यास ऐनवेळी पैशाचा प्रश्न भेडसावू नये यासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद आधीच करुन ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती महापौर देवळेकर यांनी दिली.

महामंडळाचा कारभार मूठभर लोकांच्या हाती न राहता तो सर्वसामान्यांच्या हाती रहावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महामंडळासाठी प्रत्येकाकडून वर्गणी गोळा करण्याची माझी तयारी आहे. संमेलनाच्या आयोजनाचा विषय १७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चेला येईल व घटनात्मक तरतुदीनुसार संमेलनसाठी प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाईल.
- श्रीपाद जोशी, अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष

साहित्य संमेलनात साधेपणा आणण्याचा आग्रह मी धरला आहे. भपकेबाजपणा टाळून, भोजनावळी न घालता केवळ साहित्यावर चर्चा व्हावी. - मिलिंद जोशी,
पुणे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष

महापौर देवळेकर यांनी संमेलनाच्या यजमानपदाचा निर्णय होण्यापूर्वीच ५० लाख रुपयांची तरतूद करणे ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. सकारात्मक लोकप्रतिनिधी व साहित्यप्रेमी असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. आता महामंडळ काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष लागले आहे. - राजीव जोशी,
अध्यक्ष, कल्याण सार्वजनिक वाचनालय

Web Title: KDMC 50 lakhs for literature conferences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.