केडीएमसीत सत्ताधारी नगरसेविकांचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 12:25 PM2017-08-01T12:25:32+5:302017-08-01T12:40:56+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आक्रमक झालेली बघायला मिळते आहे,
कल्याण, दि. 1- कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आक्रमक झालेली बघायला मिळते आहे. आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात महापालिकेतील शिवसेना नगरसेविकांनी एल्गार पुकारला आहे. शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन सुरू केलं आहे. आयुक्त वेळ देत नाहीत तसंच विकास कामं रखडल्याचा आरोप या नगरसेविकांकडून केला जातो आहे. दोन वर्षे निवडुन आलो पण विकास कामांच्या फाईल मंजूर होत नाहीत. रस्त्यावरील खड्डे, पाणी टंचाई, कचरा मुद्दे गंभीर बनले आहेत त्यामुळे आम्हाला नागरीकांच्या रोषाला बळी पडावं लागत आहे, असं मत या नगरसेविकांनी व्यक्त केलं आहे. २७ गावांच्या विकासाबाबत शासनाकडून दुजाभाव केला जातो आहे. या नगरसेविकांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी वेळ द्यायला टाळाटाळ केल्याने नगरसेविकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या ठिय्या आंदोलनानंतर आयुक्तांनी वेळ दिल्याने आता शिवसेना नगरसेविका आणि आयुक्तांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.भाजपच्या नगरसेवकांना न्याय दिला जातो पण आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं जातं आहे, असा आरोपही या नगरसेविकांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत ६५ टक्के महिला नगरसेविका आहेत. पण शिवसेनेच्या नगरसेविकांना सापत्न वागणूक मिळते आहे. याविषयावर महापौरांनी आक्रमक होणं अपेक्षित होतं पण तसं होत नाही, असा आरोप या नगरसेविकांनी केला आहे. पदाधिकारी निष्क्रिय असल्याचाही केला जातो आहे. आमच्या मागण्यांकडे खासदार, आमदाराही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो आहे.
काम करायची नसतील तर आयुक्तांनी परत जावं, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसंच आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे. महापालिकेत आलेल्या नगरसेवकांकडू आयुक्त हटविण्याच्या घोषणा देण्यात आल्या तसंच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या आंदोलनात महापौर, सभापतीही सहभागी असल्याची माहिती मिळते आहे.