केडीएमसीचा ‘रात्रीस खेळ चाले’

By admin | Published: March 21, 2016 01:20 AM2016-03-21T01:20:12+5:302016-03-21T01:20:12+5:30

मे महिन्याच्या आत काँक्रीटीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी, महिनाअखेरपर्यंत त्या कंत्राटाची बिले काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध विभागांची लगबग सुरू आहे

KDMC's 'play game in the night' | केडीएमसीचा ‘रात्रीस खेळ चाले’

केडीएमसीचा ‘रात्रीस खेळ चाले’

Next

डोंबिवली : मे महिन्याच्या आत काँक्रीटीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी, महिनाअखेरपर्यंत त्या कंत्राटाची बिले काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध विभागांची लगबग सुरू आहे. त्यामुळे सध्या डोंबिवलीत मध्यरात्रीच्यावेळी विकासकामांचा खडखडाट सुरू आहे. खोदकाम, डम्परची वाहतूक,
पोकलेन यंत्रांचा खडखडाट यामुळे अधिकारी-कंत्राटदारांचे चांगभले होत असले, तरी नागरिकांची मात्र झोपमोड होते आहे.
गेले वर्षभर कल्याण आणि डोंबिवली शहरांत काँक्रीटीकरणाच्या कामाला गती आली आहे. वर्दळीचे रस्ते असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात, प्रमुख चौकांत, भरपूर दुकाने असलेल्या परिसरांत रात्रीच्या वेळी ही कामे पूर्ण केली जात होती. परिणामी, दिवसा तेथे कोंडी होत नसे. मात्र काँक्रीटीकरणाच्या कामात पुढेही तोच पायंडा पडला. त्यामुळे रस्ते फोडण्याचे, खोदण्याचे, तेथे भूमिगत नागरी सुविधा उभारण्याचे आणि नंतर प्रत्यक्ष काँक्रीट टाकण्याचे, त्यावर पाणी मारण्याचे ही सारी कामे रात्री होत होती. त्यामुळे रात्रभर वाहनांची वर्दळ, मजुरांचा आरडाओरडा, यंत्रांची खडखड सुरू असे. पण प्रमुख रस्ते असल्याने त्यावेळी तक्रार करूनही कोणी फारशी मनावर घेतली नाही. मात्र आता नागरी वस्त्यांत सुरू असलेल्या कामांतही तोच प्रकार सुरू आहे.
सध्या टंडन रस्त्यावर म्हाळगी चौक ते वडारवाडी पट्ट्यात काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यात अडथळे टाकणे, काँक्रीटीकरणासाठी खोदकाम करणे, भूमिगत सुविधांचे एकत्रिकरण करणे ही कामे गेले तीन दिवस मध्यरात्री दीड वाजता सुरू केली जातात आणि ती पहाटेपर्यंत चालतात. एकतर दिवसभर येथे होणाऱ्या कोंडीमुळे वाहनांचे आवाज आणि रात्री विकासकामांमुळे-त्यांच्या ठेकेदारांमुळे होत असलेल्या आवाजांमुळे परिसरातील नागरिक त्रासून गेले आहेत. वस्तुत: चौकापासून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला आहे. त्यामुळे तेथे दिवसाही बरीचशी कामे होऊ शकतात. पण अधिकाऱ्यांच्या रात्रीच्या खेळामुळे नोकरदारांचा जीव मेटाकुटीला आला आहे. तीन नगरसेवकांच्या सीमेवरील ही कामे असल्याने याबाबत ना नगरसेवक आवाज उठवताहेत ना अधिकारी लक्ष घालताहेत, अशा स्थितीत गेले काही दिवस रात्रीचा दिवस सुरू आहे.

 

Web Title: KDMC's 'play game in the night'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.