Join us

बारामती कायमची बंद ठेवा, काय फरक पडतोय?; अंजली दमानियांनी राष्ट्रवादीला डिवचलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 9:12 AM

शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदचं आवाहन केलं आहे. हे हास्यास्पद आहे.

मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पवारांवरील केलेली कारवाई राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप पवार समर्थकांनी केला आहे. शरद पवारांच्या समर्थनार्थ बारामती बंदची हाक कार्यकर्त्यांनी दिली आहे. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. बारामती बंद करणं हास्यास्पद असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. 

अंजली दमानिया यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदचं आवाहन केलं आहे. हे हास्यास्पद आहे. चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी असं सांगत बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? मात्र त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होतं अशा शब्दात दमानिया यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. 

दमानिया यांनी यापूर्वीदेखील राज ठाकरेंना ईडी चौकशीसाठी बोलाविले असताना त्यांच्यावरही टीका केली होती. कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. चौकशीसाठी गेलेल्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा होते. त्यावरून अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी केला होता.  

सहकुटुंब ईडीच्या कार्यालयाकडे गेलेल्या राज ठाकरेंना अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून सवाल विचारला होता ''राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? की सहानूभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न.'' असे ट्विट दमानिया यांनी केलं होतं. त्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांना ट्रोल केलं होतं. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दमानिया यांना संकटांवेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे परिवार राज ठाकरेंसोबत गेला तर कोणी टीका करू नये, असं म्हणत टोला लगावला होता. 

शरद पवार कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार?मध्यवर्ती शिखर बॅँकेच्या संचालक मंडळात शरद पवार नसले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली बॅँकेचा कारभार सुरू होता, असा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. त्यामुळे त्यांचा मुख्य सूत्रधारांमध्ये समावेश करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आवश्यकतेनुसार याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याविरुद्ध नोटीस बजावून चौकशीला बोलावण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :अंजली दमानियाशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस