मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यात करण्यासाठी खास प्लॅनिंग सुरू आहे. मुंबईत की मुंबईबाहेर सेलीब्रेशन करायचे हे आतापर्यंत अनेक जणांचे निश्चित झाले आहे. पार्टीसाठी जागा ठरली असली तरीही ‘फूड’वर चर्चा सुरूच असेल. थर्टीफर्स्टची पार्टी एन्जॉय करण्यासाठी आहार संतुलित ठेवा, असा आहारतज्ज्ञांचा सल्ला आहे. ख्रिसमसनंतर वेध लागतात ते नववर्षाच्या स्वागताचे. ३१ डिसेंबरला सायंकाळपासूनच थर्टीफर्स्टची पार्टी सुरू होते, ती थेट पहाटेपर्यंत सुरू असते. एन्जॉयमेंटच्या व्याख्येत खाण्यालाही महत्त्व आहे. त्यामुळे जिथे पार्टी करायची असते तिथल्या फूडविषयी अभ्यास केला जातो. थर्टीफर्स्टसाठी स्पेशल फूडची आणि ड्रिंक्सची आॅर्डर बुक केली जाते. पण, आनंद, उत्साह साजरा करताना मर्यादेत मद्यपान करावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ नीती देसाई यांनी दिला आहे. नीती यांनी सांगितले, महिला आणि पुरुष यांच्या शारीरिक ठेवणीनुसार महिलांनी मद्यप्राशन केल्यास त्यांच्यावर लवकर परिणाम व्हायला सुरुवात होते. अति प्रमाणात मद्यप्राशन केल्यास महिला आणि पुरुष दोघांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मद्यप्राशन करताना खात राहावे. त्यामुळे मद्याचा शरीरावर कमी परिणाम होतो. थर्टीफर्स्टची पार्टी म्हटल्यावर मध्यरात्रीनंतर जेवतात. पण जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर जेवावे. अनेक जण नवीन वर्षासाठी संकल्प करतात. त्यात वजन कमी करणार, बाहेरचे अन्न खाणे टाळणार, व्यायाम करणार असे संकल्प अनेक जण करतात. १ जानेवारीपासून असा संकल्प करणार असाल तर ३१ डिसेंबर म्हणजे एक दिवस आधीपासूनच संकल्प लक्षात ठेवून काही प्रमाणात त्याची अंमलबजावणी सुरू करा. कोहिनूर रुग्णालयातील आहारतज्ज्ञ वैशाली मराठे यांनी सांगितले, पार्टी म्हटल्यावर बहुतांश जण डाएट फॉलो करणे टाळतात. एक दिवस असे केल्यास समतोल साधण्यासाठी १ जानेवारीला ‘लाइट डाएट’ घेणे आवश्यक आहे. मुंबईत थंड हवामान आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी असे त्रास जाणवतात. यापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी पार्टीमध्ये तंदुरी प्रकारचे अन्नपदार्थ खावेत. कोल्डड्रिंक्स पिण्याऐवजी गरम पेये घ्यावीत. कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळावे. पूर्ण शिजलेले अन्नपदार्थ खावेत. (प्रतिनिधी)मुंबईत थंडी वाढल्यामुळे लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थर्टीफर्स्टची पार्टी म्हणजे रात्री उशिरापर्यंत चालते. या पार्टीत मुलेही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. पण रात्री तापमानाचा पारा उतरत असल्यामुळे मुलांना त्रास होऊ शकतो.
थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी आहार ठेवा संतुलित
By admin | Published: December 28, 2015 2:52 AM