Join us

सेराफेस्टमध्ये फ्युजन कलाकृतींचा ठेवा; २५ कलाकारांचे सामूहिक प्रदर्शन

By स्नेहा मोरे | Published: January 17, 2024 7:16 PM

यंदाचे सेराफेस्ट – २०२४ चे दहावे वार्षिक सामुहिक कलाप्रदर्शन असून नरीमन पॉइंट येथील बजाज भवन मधील बजाज हॉल येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे.

मुंबई - मागील काही वर्षांत मातीकाम कलेला पुन्हा एकदा वलय प्राप्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्टुडिओ पॉटर्स असोसिएशनच्या वतीने २५ कलाकारांचे सामूहिक प्रदर्शन आयोजित केले आहे. यंदाचे सेराफेस्ट – २०२४ चे दहावे वार्षिक सामुहिक कलाप्रदर्शन असून नरीमन पॉइंट येथील बजाज भवन मधील बजाज हॉल येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे.

सेराफेस्ट २०२४ सामुहिक कलाप्रदर्शनात मुंबई व इतर शहरातील २५ नामवंत कलाकारांचा समावेश असून त्यांनी आपल्या अनोख्या व वैशिष्ट्यपूर्ण रचनात्मक शैलीत साकारलेली विविधांगी मोहक व लक्षवेधी कलारूपे या प्रदर्शनात मांडली आहेत. या तीन दिवसांच्या सेरामिक आर्ट फेस्टिवलमध्ये प्रामुख्याने हाताने बनविलेल्या सेरामिकच्या विविध कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. ज्यात अनेक घरगुती वस्तूंसह घर सजावटीसाठी काही खास वस्तु, सेरामिक शिल्प, भित्ती चित्र, फुलदाण्या, दागदागिने, आधुनिक प्लेट्स व बाउल्स, कॉफी मग, टी पॉट, टेबलवेयर, मुखवटे अशा पारंपरिक व आधुनिक अशा फ्युजन कलाकृतींचा समावेश आहे. यात प्रत्येक कलाकारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षवेधी कलाकृती पाहायला मिळणार असून माती या एकाच माध्यमातून कलाकार अनेक कलाकृती निर्माण करू शकतो याचा अनुभव या प्रदर्शनात प्रत्यक्षात घेता येईल.

या प्रदर्शनात शालन डेरे, वनमाला जैन, अनुपमा शंकर, बिपाशा सेन गुप्ता, दीपाली खरे, हरीश शाह, कविता लिंदेनमेयर, खुशबू मदनानी, लिडविन, मंजिरी तांबे, मनप्रीत, मेधा भावे, किरण मोडक, निलेश बेंडखळे, पवन बाविस्कर, रेणुका आदिक, दीपक नमसाळे, लीना हांडे, सुरेश प्रजापती, श्रुती मनवटकर, सुलताना खान, तेजश्री पाटील प्रधान, उत्तरा हेबळे, विधी देढिया, यामिनी ढाल या कलाकारांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई