गणरायाची मूर्ती ४ फूट ठेवा, उत्सवात गर्दी नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:35 AM2020-06-28T03:35:20+5:302020-06-28T03:35:46+5:30
मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करा आणि श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची ४ फुटापर्यंत ठेवा, गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बेठकीच्या एकमत झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. गणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्वाची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील 'गोविंदा उत्सव' म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आमदारांनी दहीहंडी उत्सवाचे १ कोटी रुपये कोरोना लढाईसाठी खर्च केले. महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याचा हा आदर्श व परंपरा सार्वजनिक गणेशोत्सवातही दिसेल, अशी आशाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलून दाखविली.