माणसांतील मूल जपून ठेवा - कैलाश सत्यर्थी

By admin | Published: October 31, 2015 12:42 AM2015-10-31T00:42:32+5:302015-10-31T00:43:26+5:30

लहानपणी सगळेच पवित्र, खरे आणि सोज्वळ असतात. पण ही मुले मोठी झाल्यावर बदलत जातात. त्यांच्यातील चांगले गुण कमी होत जातात.

Keep KNOW YOUR CHILDREN - Kailash Satyarthi | माणसांतील मूल जपून ठेवा - कैलाश सत्यर्थी

माणसांतील मूल जपून ठेवा - कैलाश सत्यर्थी

Next

मुंबई : लहानपणी सगळेच पवित्र, खरे आणि सोज्वळ असतात. पण ही मुले मोठी झाल्यावर बदलत जातात. त्यांच्यातील चांगले गुण कमी होत जातात. समाजात, जगात बदल करायचे असल्यास पवित्रपणा, खरेपणाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे बदल घडवण्यासाठी पहिल्यांदा माणसांतील मूल जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी यांनी केले.
कोरो आणि लीडर्स क्वेस्टतर्फे ‘उम्मीदों की उडान - ग्रासरुट लीडरशिप फेस्टिव्हल’ गोवंडी येथे भरवण्यात आला आहे. तळागाळातून पुढे आलेल्या नेतृत्वांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दोन दिवस हा फेस्टिव्हल सुरू राहील. फेस्टिव्हलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी आणि एडलगिव्ह फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या शहा यांच्या हस्ते झाले. फेस्टिव्हलदरम्यान ‘बदलत्या जगातील नेतृत्वात करुणेचे स्थान’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात कैलाश सत्यर्थी यांनी विचार मांडले.
बदल घडवण्याची शक्ती ही मुलांसारख्या सोज्वळ दृष्टिकोनात आहे. छोट्यांच्या नजरेतून जगाकडे पाहिल्यास एक वेगळे जग दिसते. तर मोठ्यांच्या नजरेतून दिसणारे जग भिन्न असते. त्यामुळे मोठ्या माणसांतील मूल जपले गेले पाहिजे. जगात १० कोटी मुले ही शिक्षण, अन्न आणि त्यांच्या इतर हक्कांपासून वंचित आहेत. पण या मुलांना हक्क मिळवून देण्यासाठी १० कोटी तरुणांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. या तरुणांनी वंचित मुलांना शिक्षणाची सोय केली पाहिजे. सरकारवर दबाव आणण्यासाठी करुणा आणि संयमाने आंदोलने झाली पाहिजेत. अशी आंदोलने उभी राहिल्यास सरकारवर दबाव येऊन बदल घडू शकतात, असेही या वेळी सत्यार्थी यांनी नमूद केले.
सद्य:परिस्थितीत बदलासाठी संवाद वाढला पाहिजे. जनता, राजकारणी, व्यावसायिक आणि इतर सर्व पातळ्यांवर संवाद साधला गेला पाहिजे. हा संवाद लहानपणापासून असला पाहिजे. लहानपणी मुलांची जडणघडण करताना, पालक, नातेवाईक आणि समाज त्यांना दुभंग होण्याची शिकवण देतो. लहान मुलांना जात, धर्म, राज्य, देश यापैकी कोणतीच गोष्ट माहीत नसते. आपण त्यांना एकसंघ होण्याची शिकवण दिली पाहिजे. व्यावसायिक हे नेतृत्व करणारे असतात. आपल्याकडे राजकीय, व्यावसायिक नेतृत्व करणारे अनेक जण आहेत. पण खरी गरज आहे ती नीतिमूल्यांचे नेतृत्व करणाऱ्यांची, असेही सत्यर्थी यांनी सांगितले.

Web Title: Keep KNOW YOUR CHILDREN - Kailash Satyarthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.