एक तास दिवे बंद ठेवा
By admin | Published: March 28, 2015 12:33 AM2015-03-28T00:33:21+5:302015-03-28T00:33:21+5:30
वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडतर्फे २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास आयोजित ‘अर्थ अवर’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरणवाद्यांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबई : पर्यावरणाची हानी टाळण्यासह कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडतर्फे २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास आयोजित ‘अर्थ अवर’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरणवाद्यांनी मुंबईकरांना केले आहे.
पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेला असमतोल काही अंशी कमी करण्यासाठी वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडतर्फे ‘क्लायमेट चेंज’ या विषयावरील जनजागृती अभियान अर्थात ‘अर्थ अवर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना या उपक्रमांतर्गत आहे. एक तास वीज बंद ठेवणे, हा निश्चितच ठोस उपाय नाही.
तथापि, एक प्रतीकात्मक प्रयोग म्हणून याकडे जगभर पाहिले जाते. यानिमित्ताने का होईना प्रत्येकाने अल्पसा पुढाकार घेत यात सहभागी व्हायला हवे. जगातील बहुसंख्य जनता पर्यावरणाविषयी दिवसेंदिवस जागरूक होत आहे.
पर्यावरण रक्षणाला हातभार लावण्यासाठी ‘अर्थ अवर’ या उपक्रमाला ‘लोकमत’नेही पाठिंबा दर्शवला आहे. २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवावेत, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराकडून करण्यात येत आहे. सदैव नावीन्यपूर्ण उपक्रमांना साथ देणारे मुंबईकर या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहतील, असा ‘लोकमत’ला विश्वास आहे. (प्रतिनिधी)