महापौर किशोरी पेडणेकर यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला तलावातील गाळ काढून तलाव नैसर्गिकरीत्या जतन करून त्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवावे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
अंधेरी पश्चिमच्या वर्सोवा येथील लोखंडवाला तलावाची शुक्रवारी महापाैरांनी पाहणी केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना सदर निर्देश दिले.
बाजार व उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे, के/पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, उपविभाग संघटिका जागृती भानजी, शाखाप्रमुख सतीश परब, सिद्धेश चाचे, शाखा संघटक आश्विनी खानविलकर, बेबी पाटील तसेच शिवसेनेचे उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, संबंधित महापालिका अधिकारी व नागरिक या वेळी उपस्थित होते.
यासंदर्भात महापौरांच्या दालनात संबंधित सर्व आस्थापनांतील प्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित करण्यात आले. यासंबंधीचा सर्व पाठपुरावा बाजार उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे करीत आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले की, नैसर्गिकरीत्या हा तलाव तयार झाला असून ताे जसा आहे त्याच पद्धतीने त्याचे संवर्धन झाले पाहिजे, अशी येथील पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या भागातील गाळ काढून या तलावाचे संवर्धन करावे, असे निर्देश महापौरांनी या वेळी दिले. त्याचप्रमाणे या ठिकाणी विदेशातून शंभरपेक्षा अधिक स्थलांतरित पक्षी येत असून त्यांचा अधिवास सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना केल्या. या सर्व कामांना ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी, पश्चिम उपनगरे, खारफुटी संवर्धन सेल यांची संयुक्त बैठक महापौर दालनात घेण्याचे तसेच जलचर, निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र बजेट हेडमधून सर्व कामे करण्याचे निर्देश महापौरांनी या वेळी दिले. या संपूर्ण कामांमध्ये स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांचा सहभाग घेऊन त्यांच्या सूचनांप्रमाणे येथील कामाला गती द्यावी, असेही महापौरांनी सांगितले.
........................................