Join us

लाॅकडाऊनमध्येही बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवा : कृषिमंत्र्यांचे विभागाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:06 AM

कृषिमंत्र्यांचे विभागाला निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यांत लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. याकाळात ...

कृषिमंत्र्यांचे विभागाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यांत लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी विभागाला दिले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन, कापूस व मका पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक मंगळवारी कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषिमंत्र्यांसह राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हानिहाय पीक पद्धत लक्षात घेऊन मागणीनुसार बियाणे पुरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणीची जास्तीतजास्त प्रात्यक्षिके आयोजित करावीत, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

नियोजन आराखड्यानुसार बियाणे पुरवठा करताना राज्याकरिता विशेष बाब म्हणून सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा, असे आवाहनही भुसे यांनी सोयाबीन बिजोत्पादक कंपन्यांना केले. तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या उद्भवणाऱ्या तक्रारींच्या आनुषंगाने संशोधन करण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावर्षी पावसाळा वेळेवर आणि नियमित असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करावे. बियाण्यांच्या वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येणार नाही, यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे, असे भुसे यांनी सांगितले.

..............................................