कुंभमेळा तुम्हाला ठेवा, पालकमंत्री आमचा करा; शिंदेसेनेच्या नव्या मागणीने भाजपपुढे पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 06:39 IST2025-03-04T06:39:14+5:302025-03-04T06:39:51+5:30
नाशिकचे पालकमंत्रिपद हे आपल्या पक्षाचे मंत्री दादा भुसे यांना द्यावे आणि स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद भाजपने घ्यावे, असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याची माहिती शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली.

कुंभमेळा तुम्हाला ठेवा, पालकमंत्री आमचा करा; शिंदेसेनेच्या नव्या मागणीने भाजपपुढे पेच
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नाशिकचे पालकमंत्रिपद आम्हाला द्या आणि कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात यावयाच्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद गिरीश महाजन यांना द्या, असा नवा प्रस्ताव आता शिंदेसेनेने दिल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एक बैठक मुंबईत घेतली होती. कुंभमेळा यशस्वी करायचा तर त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे, असे निर्देश त्यांनी दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाचा धागा पकडून आता शिंदेसेनेने नाशिकचे पालकमंत्रिपद हे आपल्या पक्षाचे मंत्री दादा भुसे यांना द्यावे आणि स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद भाजपने घ्यावे, असा प्रस्ताव दिला असल्याची माहिती शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली.
दुसरीकडे भाजपने हा प्रस्ताव अमान्य केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. प्राधिकरणाची जबाबदारी एकाकडे आणि पालकमंत्रिपद दुसऱ्याकडे असे करणे योग्य राहणार नाही. कारण, त्यातून समन्वयाचे अनेक प्रश्न निर्माण होतील. शेवटी प्रत्येक निर्णय घेण्याचे अधिकार हे पालकमंत्र्यांना असतात, त्यामुळे प्राधिकरणाला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे जावे लागेल, असे भाजपचे म्हणणे असून ते उपमुख्यमंत्री शिंदे यांना कळविल्याची माहिती आहे. अजित पवार गटानेही नाशिकच्या पालकमंत्रिपदाची मागणी कायम ठेवली आहे.
रायगडसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला...
नाशिकप्रमाणे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढाही कायम आहे. अजित पवार गटाच्या महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून आधी झालेली नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगित केली होती. तेथे त्यांच्याऐवजी भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद द्यावे यासाठी शिंदेसेना अडून बसली आहे. आता या दोन्ही गटांना अडीच वर्षांसाठी पालकमंत्रीपदाची संधी द्यावी, असा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते.