Join us

भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांना दोन वर्षे बाहेरच ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास नाही. प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्षवाढीसाठी पक्षाध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास नाही. प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्षवाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खानावळ नाही, असे खडेबोल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे काही क्षणातच पडले.

अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना वेटिंगमध्ये राहण्याचा सल्ला आव्हाड यांनी दिला, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ‘ईडी’ने पाठवलेली नोटीस आणि साताऱ्यातील भरपावसातील प्रचारसभा यामुळे गेम चेंज झाला आणि राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलीच चपराक बसली.

या घटनांमुळे राष्ट्रवादीने दमदार उभारी घेत ५५ आमदार विजयी झाले. केंद्र सरकारची शेती आणि कामगार विरोधी धोरणे चिंताजनक असल्याचे सांगून सुळे यांनी मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद संसदेतून निवृत्त होणार म्हणून पंतप्रधानांना सभागृहात अश्रू अनावर झाले. मात्र, नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत, असा टोला सुळे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीत भाजपला कात्रजचा घाट दाखविण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून, आता नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, असा दावा प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी केला. यावेळी प्रमोद हिंदुराव, महेश तपासे, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, विद्या वेखंडे, आयोजक सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, वृषाली पाटील, कबीर गायकवाड, आदी उपस्थित होते.

भाजपचे किसन तारमळे राष्ट्रवादीत

भाजपचे ठाणे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष किसन तारमळे यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक बिरजू जयस्वाल, भगवान सासे, अजिंक्य सावंत, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत केले.