Join us

कोरोनावरील लसीचे दर एकसमान ठेवा, काेर्टात याचिका; लस १५० रुपयांना देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 6:18 AM

काेर्टात याचिका; लस १५० रुपयांना देण्याची मागणी

मुंबई : कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या केंद्र व राज्य सरकारला वेगवेगळ्या दरात लस विकत आहेत. हा भेद बाजूला सारून संपूर्ण देशात ही लस १५० रुपयांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मुंबईचे रहिवासी व व्यवसायाने वकील असलेले फयाज खान आणि तीन लॉच्या विद्यार्थ्यांनी ही जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार लस ही ‘जीवनावश्यक वस्तू’ आहे. त्यामुळे लसींचे व्यवस्थापन आणि वितरण हे खासगी लोकांच्या हातात असू नये.कोरोनामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. लोकांच्या भीतीचा गैरफायदा या बड्या फार्मा कंपन्या घेत आहेत. संबंधित कंपन्या जेवढ्या लसींचे उत्पादन करेल त्यातील ५० टक्के वाटा केंद्र सरकारला तर उर्वरित ५० टक्के राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत केंद्र सरकार लसींचा पुरवठा करत आहे. मात्र, ज्या राज्यांत भाजपचे राज्य नाही, त्या राज्यांना केंद्र सरकार लसींचा साठा पुरवत नाही. त्यांना महागड्या दरात लस खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. लसींचा काळाबाजार व सामान्यांची लूट थांबवण्यात यावी, असेही याचिकेत नमूद आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने जाहीर केलेले लसीचे दर रद्द करावेत. तसेच सर्व नागरिकांना  एकाच दरात म्हणजे १५० रुपयांना लस उपलब्ध करण्याचे आदेश या दोन्ही फार्मा. कंपन्यांना द्यावेत, अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस