Join us

दृश्यकलेचा अनोखा ठेवा अभ्यासकांसाठी उपयुक्त - रुस्तम जीजीभाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लहानपणापासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेशी वेगळेच ऋणानुबंध आहेत. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लहानपणापासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेशी वेगळेच ऋणानुबंध आहेत. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी संस्थेत येणे होते. या वास्तूविषयी आत्यंतिक जिव्हाळा आणि प्रेम आहे. मात्र या वास्तूत माझ्या हस्ते दृश्यकलेच्या ग्रंथाचे प्रकाशन हा दुर्मीळ योग आहे आणि अशा स्वरूपाचे कार्यक्रम घडतात याचा आनंद आहे. संस्थेच्या व्यवस्थापनावर नसूनही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने आयोजकांचे आभार. दृश्यकलेच्या ग्रंथाच्या निमित्ताने हा अनोखा ठेवा विद्यार्थ्यांपासून ते अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास जमशेदजी जीजीभाय यांचे वंशज आणि शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करणारे रुस्तम जीजीभाय यांनी मंगळवारी व्यक्त केला.

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या वेळी प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, कला समीक्षक दीपक घारे, दाडिबा पंडोल, फिरोजा गोदरेज आणि चित्रकार सुधीर पटवर्धन अशा दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. १८ व्या शतकापासून ते २१ व्या शतकापर्यंतच्या संपूर्ण कालखंडातील प्रवास ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ या ग्रंथात समाविष्ट आहे. या ग्रंथात सुमारे ३०७ कलाकार आणि चार प्रमुख कला संस्थांविषयीच्या लेखनाचा समावेश असून प्राचीन काळ ते आधुनिक काळापर्यंतच्या २२७ चित्रांचा समावेश आहे. तर ८२८ कृष्णधवल चित्रांसह १ हजार १८० अन्य चित्रे आहेत.

या वेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी चित्रकला-शिल्पकला महत्त्वपूर्ण असूनही तिची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष दखल घेतली गेलेली नाही, अशी खंत व्यक्त केली. आपल्याकडे राजकीय आणि सामाजिक दोन्ही पातळीवर चित्रकलेसंबंधी असलेल्या अनास्थेमुळेच आपली कलापरंपरा अद्याप दुर्लक्षित आहे. त्यामुळेच हा चरित्रकोश तयार करताना आम्हाला सहज काहीच हाताशी लागले नाही. शोध घेत जावे लागले. मात्र हा शोध आणि प्रवास परिपूर्ण करणारा ठरला आहे. दृश्यकलेशी संबंधित हा ग्रंथ कला क्षेत्रातील साहित्यसंपदेचे वैभव वाढविणारा असून नवोदित विद्यार्थी, कलाकार आणि अन्य मंडळींना मार्गदर्शक ठरणारा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

* मराठी कोशही उपलब्ध

राज्यातील दोनशे वर्षांतल्या चित्र-शिल्पकारांची नोंद घेणा‍ऱ्या दृश्यकला चरित्रकोशाचा आढावा मराठी भाषेतील ग्रंथातही घेण्यात आला आहे. या कोशाची पृष्ठसंख्या ९०० असून प्रत्येक कलावंताचे किमान एक चित्र देण्याचा प्रयत्न कोशकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या कोशातही तब्बल ८०० कृष्णधवल चित्रे आहेत. तर १८८ रंगीत चित्रांची ‘कलासंचित’ अशी एक वेगळी पुरवणीच या कोशात आहे. त्यामुळे कलावंतांच्या केवळ नोंदीच नाही, तर चित्रांच्या माध्यमातूनही एक मोठाच दस्तावेज या कोशातून तयार झाला आहे.

* फाेटाे ओळ - ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ या ग्रंथाच्या प्रकाशनसमयी (डावीकडून) जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, कलासमीक्षक दीपक घारे, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, रुस्तम जीजीभाय आणि दाडिबा पंडोल. (छाया : सुशील कदम)

-------------------