Join us

'आपलं शहर शांत ठेवुया, रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरणार बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 5:58 PM

परतवाडा येथील खुनाच्या घटनेनंतर, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हबीबनगर, मुगलाईपुरा, स्वस्तिकनगर, नाईक प्लॉट परिसरात तणाव वाढला होता.

मुंबई - परतवाडा येतील खुनाच्या घटनेनंतर अमरावती, अचलपूरमधील तणावसदृश्य परिस्थिती शांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत, तर घटनेतील तीनही मृतांवर मंगळवारी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. अंतिम संस्कारापूर्वी त्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन केले गेले. दरम्यान जुळ्या शहरात तणाव कायम असल्याने बुधवार दुपारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अचलपूरचेआमदार आणि प्रहार संघटनेते अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपलं शहर शांत ठेवायचंय, असं आवाहन सर्वच नागरिक अन् कार्यकर्त्यांना केलं आहे. 

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग पाहायला मिळत आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या शक्तिप्रदर्शानाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. मात्र, अचलपूर मतदारसंघातील परतवाडा येथे झालेल्या खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे, 4 ऑक्टोबर 2019 रोजी प्रहार संघटनेच्या वतीने होणाऱ्या नामांकन प्रचार रॅली रद्द केल्या जात आहेत. त्या ऐवजी रक्तदान करून नामांकन भरुया, सर्वच नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपलं शहर शांत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायचाय, असे आवाहन आमदारबच्चू कडू यांनी केलं आहे. 

राजकारणात हार-जीत हा विषय महत्त्वाचा नाही. आपल्या शहरात घडलेला प्रसंग दुर्दैवी असून या शहरात यापूर्वी कधीही अशी घटना घडली नाही. हिंदू-मुस्लीम बांधवांनी शांतता कशी राहिल अन् आपल्या शहराचं नावलौकिक कसं राहिल हेच पाहायला हवं. ज्यांना शक्यय त्यांनी रक्तदान करावे. रक्तदान करुनच आपण आपला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. मात्र, त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे आपलं शहर शांत ठेवायचं आहे. आपलं शहर शांत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांन केलं आहे. तसेच, अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात येणारी रॅलीही रद्द करण्यात आल्यांच त्यांनी सांगितलं. 

परतवाडा येथील खुनाच्या घटनेनंतर, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हबीबनगर, मुगलाईपुरा, स्वस्तिकनगर, नाईक प्लॉट परिसरात तणाव वाढला होता. जयस्तंभ, आठवडी बाजाराकडून शहरात येणारे रस्ते पोलिसांनी बंद केले. दगडफेक आणि शस्त्र काढल्याच्या ही घटना घडल्यात. आयजी मकरंद रानडे परत शहरात दाखल झाले. पोलिसांवर दगडफेक झाली. 50 दुचाकींवर 100 हेल्मेटधारी पोलीस दंडुके घेऊन फिरत होते. घटनेनंतर अचलपूर, परतवाडा या दोन्ही शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफ, दंगा नियंत्रण पथकाच्या तुकड्या शहरात तैनात आहेत. दोन्ही शहरांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मृतदेहाचे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. मडावी, डॉ. मिराज अली व डॉ. जवंजाळ या अधिकाऱ्यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन केले. शहरातील संचारबंदी बुधवारी दुपारपर्यंत राहील. दरम्यान मंगळवारी रात्री अन्सार नगर भागातून 12 सशस्त्र व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

घटनेनंतर उसळलेल्या उपद्रवात मो. अतिक मो. रफीक व सैफ अली म. कमाल यांच्या मृत्यूप्रकरणात दुसरा गुन्हा सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी दाखल करून घेतला. यात मो. शफीक मो. रफीक (रा. नबाब मार्केट, परतवाडा) यांच्या फिर्यादीवरून महात्मा ठाकूर, शेरा, चेतन हिवरकर, कालू यादव, शुभम ऊर्फ बम नंदवंशी व इतर आठ ते दहा जणांविरुद्ध भादंवि कलम 302, 324, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मृतक सैफ अली मो. कलाम याच्या मृतदेहावर सोमवारी मध्यरात्रीनंतर अचलपूर मार्गावरील दर्गाह परिसरात पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :बच्चू कडूआमदारअचलपूरराजकारणहिंदूरक्तपेढी