डेंग्यू रोखायचा असेल तर घर स्वच्छ ठेवा
By admin | Published: November 21, 2014 01:12 AM2014-11-21T01:12:13+5:302014-11-21T01:12:13+5:30
डेंग्यूचे थैमान रोखायचे असेल तर आधी घर स्वच्छ व आरोग्यमय ठेवा, असा सल्ला उच्च न्यायालयाने गुरुवारी सर्वसामान्यांना दिला़
मुंबई : डेंग्यूचे थैमान रोखायचे असेल तर आधी घर स्वच्छ व आरोग्यमय ठेवा, असा सल्ला उच्च न्यायालयाने गुरुवारी सर्वसामान्यांना दिला़
न्यायालय म्हणाले, डेंग्यू रोखण्यासाठी सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहे़ जनतेनेही स्वच्छता ठेवून याला हातभार लावावा़ कारण हा आजार स्वच्छतेने रोखणे शक्य आहे़ त्याचवेळी राज्य शासनाने हा आजार महामारी म्हणून घोषित करता येणार नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले़ मुळात हा आजार संसर्गजन्य नाही़ आतापर्यंत या आजाराने बळी गेलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणे आवश्यक आहे, असे शासनाने न्यायालयाला सांगितले़ त्याची नोंद करून घेत याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने शासनाला दिले़ गेल्या पाच महिन्यांपासून हा रोग संपूर्ण राज्यात फैलावला आहे़ राज्य शासन व स्थानिक प्रशासनही या रोगांना रोखण्यात अपयशी ठरले आहे़ यामुळे अल्पवयीन मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत बहुतांश जणांना याची लागण झाली व यात शेकडोंचा बळी गेला़ याचे प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण राज्यात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे़ तेव्हा राज्यात महामारी घोषित करून स्वच्छता अभियान राबवावे, फवारणी करावी व या रोगांबाबत जनजागृती करावी, असे नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते गवळी यांच्या याचिकेत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)