आगरी समाजाच्या संस्कृतीची साक्ष देणारा १०० वर्षे जुना ठेवा

By Admin | Published: January 10, 2016 12:41 AM2016-01-10T00:41:17+5:302016-01-10T00:41:17+5:30

आगरी कोळी बांधव म्हणजे नवी मुंबईतील शहराचा प्रमुख घटक. या आगरी कोळी संस्कृतीचे खास आकर्षण असलेल्या पारंपरिक वस्तू, मासे पकडण्याची साधने, मसाला वाटण्याची उपकरणे, जाते,

Keeping 100 years old for witnessing the culture of the Agari community | आगरी समाजाच्या संस्कृतीची साक्ष देणारा १०० वर्षे जुना ठेवा

आगरी समाजाच्या संस्कृतीची साक्ष देणारा १०० वर्षे जुना ठेवा

googlenewsNext

नवी मुंबई : आगरी कोळी बांधव म्हणजे नवी मुंबईतील शहराचा प्रमुख घटक. या आगरी कोळी संस्कृतीचे खास आकर्षण असलेल्या पारंपरिक वस्तू, मासे पकडण्याची साधने, मसाला वाटण्याची उपकरणे, जाते, कंदील या सर्व वस्तू या आधुनिक काळात नाहीशा झाल्या आहेत. तांत्रिक युगात यंत्राचा वापर वाढल्याने पूर्वीच्या काळात वापरले जाणारे साहित्य काळाच्या ओघात नाहीसे झाले आहे. नेरूळमधील कुकुशेत गावातील पुंडलिक पाटील या नागरिकाने १००हून अधिक पारंपरिक वस्तूंचे जतन करून संस्कृतीचा हा ठेवा आजवर जपला आहे.
नेरूळ येथील गणेश रामलीला मैदानात आयोजित आगरी कोळी महोत्सवात या सर्वच वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले असून जाते, किसन कंदील, मुसळ, मासे पकडण्याचे फग आणि बोक्शी, खापर, बैलगाडी, टिमला, सूप, परात, किसणी, बोरूक अशा १०० हून अधिक वस्तूंचा खजिना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्याच्या पिढीला पूर्वजांनी वापरलेल्या साहित्याची ओळख व्हावी, कोणकोणत्या वस्तू वापरल्या जात होत्या याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, म्हणून या वस्तूंचे प्रदर्शन मांडल्याची माहिती पुंडलिक पाटील यांनी दिली.
या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वस्तूंमध्ये नागरिकांचे प्रकर्षाने लक्ष केंद्रित करणाऱ्या वस्तू म्हणजे आगरी कोळी समाजाच्या राहणीमानातल्या संसारातल्या जुन्या वस्तू. यामध्ये जेवण बनविण्यासाठी लागणारा टोप, शेतीवर काम करण्यासाठी लागणारे कोयता, विळा तसेच मच्छीमारीसाठी लागणारा भिचा, पाग आदीसह अनेक बारीकसारीक वस्तूंचा सहभाग आहे. आगरी कोळी समाज प्रगत झाला असला तरीही नव्या पिढीला आपल्या संस्कृतीला विसर पडू नये, म्हणून पुंडलिक पाटील यांच्यावतीने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. मात्र या प्रदर्शनाद्वारे इतर समाजाबरोबर आगरी कोळी समाजालादेखील आपल्या पूर्वजांच्या जीवनाची माहिती मिळाली असावी. १०० वर्षे जुन्या वस्तू आता कालबाह्य झाल्या आहेत.
नवी मुंबईमधील आगरी कोळी समाजाची जीवनशैली बदलली असली तरी ठाणे भिवंडी, पेण, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगरी समाज वास्तव्यास आहे. त्या ठिकाणी एवढा मोठा बदल झालेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Keeping 100 years old for witnessing the culture of the Agari community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.