पालिकेच्या ६४ शाळांना वर्षभरात टाळे
By admin | Published: September 3, 2016 02:16 AM2016-09-03T02:16:02+5:302016-09-03T02:16:02+5:30
व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब असे हायटेक शिक्षण देऊन शाळांचा दर्जा वाढविण्याचा पालिकेचा प्रयत्न फेल गेल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ गेल्या वर्षभरात मराठी
मुंबई : व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब असे हायटेक शिक्षण देऊन शाळांचा दर्जा वाढविण्याचा पालिकेचा प्रयत्न फेल गेल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ गेल्या वर्षभरात मराठी माध्यमातील २१ हजार, हिंदी माध्यमातील १४ हजार व गुजराती माध्यमातील १८०० विद्यार्थी कमी झाले आहेत़ यामुळे तब्बल ६४ शाळांना टाळे लागले आहे़
पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार अनिवार्य करून सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने विरोधकांचा रोष ओढवून घेतला आहे़ त्यामुळे पालिका शाळांचे प्रगतिपुस्तकच मांडत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे़ शैक्षणिक साहित्य, हायटेक शिक्षण पद्धत देऊनही पालिकेला शाळांमधील गळती रोखता आलेली नाही़ त्यामुळे २०११ ते २०१५ या काळात तब्बल ४० हजार विद्यार्थी गळाले आहेत़
गेल्या दोन वर्षांमध्ये ३४ मराठी शाळा कमी झाल्या आहेत़ पालिका महासभेत याचे तीव्र पडसाद उमटले़ नर्सरी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू केल्यास विद्यार्थी बाहेर जाणार नाहीत़ मात्र पालिका शाळांमध्ये इयत्ता सातवीनंतर विद्यार्थ्यांना अन्य शाळांचे पर्याय शोधावे लागतात़ त्यामुळे सूर्यनमस्कार व योगऐवजी विद्यार्थ्यांची गळती रोखा, असा टोला विरोधी पक्षांनी भाजपाला लगावला आहे़ (प्रतिनिधी)
अर्थसंकल्प वाढला, विद्यार्थी घटले
२०११ ते २०१२ या काळात पालिका शाळांमध्ये चार लाख ३७ हजार ८६३ विद्यार्थी होते़ या आर्थिक वर्षात शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प १७६१ कोटी रुपये होता़
अर्थसंकल्प २६३० कोटींचा : २०१४ ते २०१५ या शैक्षणिक वर्षात ही संख्या तीन लाख ९७ हजार ८५ वर आली आहे़ तर या आर्थिक वर्षात पालिकेचा अर्थसंकल्प २६३० कोटी रुपये होता़