अंधश्रद्धा दूर ठेवत ढगाळ हवामानात मुंबईकरांनी मनमुराद लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 02:39 AM2019-12-27T02:39:35+5:302019-12-27T02:39:43+5:30

दुर्बीण, सोलार चष्मा, फिल्टर्सचा वापर; नेहरू विज्ञान केंद्रात ६०० विद्यार्थ्यांची हजेरी

 Keeping away the superstition, the people of Mumbai enjoy lunar eclipse in cloudy weather | अंधश्रद्धा दूर ठेवत ढगाळ हवामानात मुंबईकरांनी मनमुराद लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

अंधश्रद्धा दूर ठेवत ढगाळ हवामानात मुंबईकरांनी मनमुराद लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

googlenewsNext

मुंबई : सूर्यग्रहणाच्या काळात मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली होती. त्यामुळे ग्रहण पाहण्याच्या मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडेल, असे चित्र निर्माण झाले होते. गुरुवारी सकाळी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई ढगाळ नोंदविण्यात आली. मात्र सकाळी साडेआठनंतर हळूहळू ढगाळ वातावरण निवळू लागले आणि मुंबई शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बच्चे कंपनीसह थोरामोठ्यांनी अंधश्रद्धा बाजूला सारत सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.

ग्रहण हे आयुष्यात कमी वेळा पाहण्याचा, अनुभवाचा योग येतो. ग्रहण अवश्य पाहा. पण सुरक्षिततेची काळजी घेऊन. सोलार फिल्टर्स चष्मे मिळतात. त्याचा वापर करून जीवनातील नैसर्गिक घटनेच्या आनंदात सहभागी व्हा, असे आवाहन करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनिस), खगोलप्रेमी संघटना, विज्ञानप्रेमी यांना ग्रहण दाखविण्याचा कार्यक्रम अंनिसच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांत आयोजित करण्यात आला होता. वरळी नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीनेही सूर्यग्रहण पाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू विज्ञान केंद्रातील बागेत गुरुवारी सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी खंडग्रास सूर्यग्रहण पाहिले. विद्यार्थ्यांसह पालक व खगोलप्रेमीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

च्मुंबईत सकाळी ८.०४ वाजता सूर्यग्रहणास आरंभ झाला. सुरुवातीला ढगाळ हवामानामुळे काही काळ ग्रहण पाहता आले नाही. मात्र, सकाळी ८.३६नंतर आकाश स्वच्छ होऊ लागल्यानंतर ढगांमधून हळूहळू का होईना ग्रहण दिसू लागले. सकाळी ९.२१ वाजता सूर्याचा जवळपास ७९ टक्के भाग झाकोळला गेला आणि अचानक संध्याकाळ झाल्यासारखे भासू लागले. मात्र, हळूहळू चंद्र पुढे सरकत गेला आणि सकाळी १०.५५ मिनिटांवर हे ग्रहण संपले.

च्ग्रहणादरम्यान नेहरू विज्ञान केंद्रातर्फे चहा-बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या सर्व प्रेक्षकांनी ग्रहणादरम्यान खाण्यापिण्यावर असलेल्या बंदीच्या अंधश्रद्धा न पाळता या ग्रहणाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे हाच यामागचा हेतू होता. ग्रहण पाहण्यासाठी दोन दुर्बीण, सोलार चष्मा, फिल्टर्स आणि बॉल-मिरर प्रोजिक्शन यांसारख्या पद्धतीचा वापर केला गेला. ग्रहण व त्यामागील विज्ञान यावर विविध प्रात्यक्षिकेही यावेळी दाखविण्यात आली.

ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धेचे केले निर्मूलन
च्अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डी.ए.व्ही.(दयानंद) शाळा, मालाड (प.), विदर्भ विद्यालय, मालाड(पू.), नंदादीप विद्यालय, गोरेगाव(पू.), प्रभादेवी महानगरपालिका शाळा, संकुल प्रभादेवी यांसह कुर्ला, घाटकोपर येथील शाळांतील विद्यार्थ्यांना हे सूर्यग्रहण दाखविण्यासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

च्सर्व ठिकाणी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते गेले होते. ग्रहणाबद्दल त्यांनी माहिती दिली. सोबत त्यांनी सोलार फिल्टर्स चष्मे नेले होते. ते लोकांना ग्रहण बघण्याचे आवाहन करत होते. लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रभादेवीतील मुलांनी अंधश्रद्धेला दूर सारत ग्रहण काळात खिचडी खाल्ली. लोकांच्या ज्या अंधश्रद्धा ग्रहणासंबंधित होत्या त्याचे कार्यकर्ते निरसन करत होते.
च्प्रभादेवी येथील महानगरपालिका शाळेतील मुलांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून ग्रहणाची माहिती समजून घेतली. तर मालाड रेल्वेस्थानकाजवळ पोलिसांनी, मालाडमधील डीएव्ही स्कूल येथील विद्यार्थ्यांनी, तसेच मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक चाळी, इमारतीतील नागरिकांनीही सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.
च्मालाड येथे श्रमिक महिलेलाही अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सूर्यग्रहण दाखविले. याशिवाय प्रभादेवी, गोरेगाव, मालाड, खार, घाटकोपर येथे सोलार फिल्टर्स चष्मे वापरून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थी तसेच नागरिकांना सूर्यग्रहण दाखविले.

Web Title:  Keeping away the superstition, the people of Mumbai enjoy lunar eclipse in cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई