coronavirus : मुंबईकरांनो; कोरोनाच्या काळात मनाचे संतुलन सांभाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 01:18 PM2020-04-02T13:18:35+5:302020-04-02T13:20:29+5:30
उत्तम मानसिक आरोग्यामुळेच संकट काळात खंबीर राहूनच आपण ही लढाई जिंकू शकतो.
मुंबई : जगभरात वाढत असलेले कोरोनाचे थैमान आणि त्यामुळे जात असलेले बळी; या गोष्टींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याचा काळ हा अतिशय खडतर झाला आहे. सर्वांनाच भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो; आणि अत्यंत घाबरून जातो. मात्र घाबरण्याचे कारण नाही. कारण या काळात आपण आपल्या मनाचे संतुलन सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आरोग्य आणि कुटूंंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.
लॉकडाऊनचे महत्व विषद करताना मंत्रालयाने सांगितले की, लॉकडाऊनचा मूळ उद्देश, एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीला होणारी लागण रोखणे हा आहे. जेणेकरून आपले आणि इतरांचे संरक्षण होईल. याचा अर्थ असा की, आवश्यक वस्तूंची खरेदी करण्याव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे, बाहेरच्या चकरा कमी करणे आणि कुटुंबातल्या एकाच सुदृढ माणसाने गरज असेल तेव्हा घराबाहेर पडणे. जर घरात कुणी आजारी असेल ज्याला वैद्यकीय मदतीची गरज असेल तर आपल्या जवळच्या वैद्यकीय केंद्राची आपल्याला माहिती असलीच पाहिजे. घरात राहणे थोडा काळ चांगले वाटू शकते, पण त्याचबरोबर काही दिवसांनी हे कंटाळवाणे आणि बंदिस्त असल्यासारखे देखील वाटू शकते. अशा स्थितीत, सकारात्मक आणि आनंदी राहण्याचे हे काही मार्ग मंत्रालयाने सांगितले आहेत.
-----------------
व्यस्त राहा. एक नियमित वेळापत्रक ठरवून घ्या. घरकामात मदत करा. संगीत, पुस्तके, दूरचित्रवाणीवरचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, यातून नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जर तुम्हाला चित्रकला, बागकाम, शिवणकाम यांसारख्या जुन्या आवडी असतील तर त्याकडे वळा. आपल्या आवडी पुन्हा एकदा वाढवा. व्यवस्थित खा आणि भरपूर द्रव पदार्थ घ्या. घरगुती व्यायाम करा. वस्तुस्थितीकडे लक्ष द्या, अफवांकडे दुर्लक्ष करा.
-----------------
माहितीमध्ये ताकद आहे. विशिष्ट समस्यांबद्दल आपल्याला जितकी जास्त माहिती असते, तितकी आपली भीती कमी होते. स्वत:च्या बचावासाठी सर्वात विश्वसनीय स्रोतांकडूनच माहिती घ्या आणि त्यावरच विश्वास ठेवा. कोण आणि कसे आजारी पडले याची जास्त चर्चा करू नका. त्यापेक्षा कोण बरे झाले त्याची माहिती घ्या.
-----------------
सर्वसामान्य सर्दी पडसे म्हणजे कोरोना संसर्ग नव्हे. कोरोनाची लक्षणे व्यवस्थित सांगितलेली आहेत. शिंकताना, खोकताना शिष्टाचार पाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. अधिकांश लोक कोरोनातून बरे होतात.
-----------------
हे करा
- अस्वस्थ वाटत असेल तर काही मिनिटे हळूहळू श्वासोच्छवास करा.
- अस्वस्थ करणारे विचार दूर ठेवा.
- काही शांत आणि सुंदर विचारांनी मन शांत करा.
- ज्यांना आपण भेटलो नाहीत अशांना फोन करा.
- गाणी आणि संगीत शेयर करा.
- तंबाखू, दारू टाळा.