Join us

‘लोकमत दीप भव’ अंक संग्रही ठेवण्यासारखा; मुंबईत दिवाळी अंकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 7:41 AM

‘लोकमत दीप भव’चे प्रकाशन अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘लोकमत’ने एक आगळावेगळा ‘दीप भव’ हा दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आणला आहे. त्यातील साहित्य दर्जेदार आहेच, पण अंकाची मांडणीही मनोवेधक आहे. त्यामुळे हा दिवाळी अंक खऱ्या अर्थाने संग्रही ठेवण्यायोग्य झाला आहे, असे उद्गार महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिश चंद्र अग्रवाल यांनी काढले.

लोकमत दीप भव’चे प्रकाशन अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे, नवी मुंबई विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर आणि डाक सेवेचे सहायक संचालक संतोष कुलकर्णी उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, सर्व वयोगटातील वाचकांचा विचार करून ‘दीप भव’ची रचना करण्यात आली आहे. समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख यात असून, वाचकांसाठी ती साहित्यिक मेजवानीच आहे.

पोस्टमनच्या आयुष्याचा वेध घेणारा लेख मला विशेष भावला. खासगी आयुष्यातील व्यथा, वेदना, अडचणी आणि आव्हानांना तोंड देत पोस्टमन लोकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देतो. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही टपाल खात्याचा डोलारा टिकून आहे. भारतीय टपाल खात्याची कार्यपद्धती, रचना आणि आजवर प्रकाशझोतात न आलेल्या विविध बाबींवर या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे टपाल विभागाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने हा अंक घेऊन तो जरूर वाचावा आणि आयुष्यभर संग्रही ठेवावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

टॅग्स :लोकमत