लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील बहुचर्चित कीर्ती व्यास हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने तिचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर व कविता सेजलानी (न्यायालयाच्या निर्देशांनुसार बदलेले नाव) यांना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्या. एम.जी देशपांडे यांनी सोमवारी सिद्धेश ताम्हणकर व कविता सेजलानी यांना हत्या, अपहरण, पुरावे नष्ट करणे व आयपीसीच्या अन्य कलमांतर्गत दोषी ठरविले.
सिद्धेश आणि कविता यांनी न्यायालयाला शिक्षेत दया दाखविण्याची विनंती केली. आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून आपले कुुटुंब अर्थाजनासाठी आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याविरोधात केवळ परिस्थितीजन्य पुरावे आहेत. मात्र, ठोस पुरावे नाहीत. पोलिसांनी गाडी दोनदा तपासूनही त्यांना रक्ताचे डाग आढळले नाहीत. मात्र, ५२ दिवसांनी गाडीत रक्ताचे डाग आढळले, असा युक्तिवाद ताम्हणकर व कविताच्या वकिलांनी न्यायालयात केला.दोन्ही आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने हत्या केली, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दरम्यान, २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कविताची जामिनावर सुटका केली तर, सिद्धेश मे २०१८ पासून कारागृहातच आहे. सोमवारी दोघांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर कविताला पोलिसांनी अटक करून तिची रवानगी कारागृहात केली.
हत्या का केली?
- २०१८ मध्ये झालेल्या या हत्येच्या खटल्यातील युक्तिवाद या महिन्याच्या सुरुवातील पूर्ण झाला. मृतदेह नसतानाही न्यायालयाने हत्येच्या आरोपाबाबत निर्णय घ्यायचा होता. ही बाब दुर्मीळ आहे.
- २८ वर्षीय कीर्ती ‘बिब्लंट’मध्ये वित्त व्यवस्थापक होती. कविता आणि सिद्धेश तिचे कनिष्ठ सहकारी होते. सिद्धेशचे काम चांगले नसल्याने १४ मार्च २०१८ रोजी कीर्तीने त्याला मेमो बजावला होता आणि या मेमोवर उत्तर देण्याची अंतिम मुदत १६ मार्च २०१८ होती. याच दिवशी कीर्ती बेपत्ता झाली.
- पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिद्धेशने १५ मार्च रोजी कीर्तीला मेमो मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, ती निर्णयावर ठाम होती. तसेच तिला विवाहित असलेल्या कविता आणि सिद्धेशच्या प्रेमसंबंधाबद्दल माहीत होते. ती याबाबत सगळ्यांना सांगेल, याची भीती दोघांनाही होती.
- दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ मार्चला कविताने कीर्तीला तिच्या राहत्या घराजवळून ‘पिकअप’ केले. तिला बॉम्बे सेंट्रल स्टेशनला सोडण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी सिद्धेशही कारमध्ये होता. त्याने त्यावेळीही कीर्तीला मेमो मागे घेण्याची विनंती केली. तिने नकार दिल्यावर सिद्धेशने तिची गळा दाबून हत्या केली.
- त्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह माहूल येथील नाल्यात फेकला. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, त्यांना तो सापडला नाही.