मित्र ल्युडो खेळात जिंकल्याच्या रागातून केली हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:05 AM2021-04-06T04:05:37+5:302021-04-06T04:05:37+5:30
मालाड पोलिसांकडून मारेकऱ्याला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपल्यासाेबत ल्युडो खेळात नेहमी हरणारा मित्र अचानक जिंकू लागल्याने रागात ...
मालाड पोलिसांकडून मारेकऱ्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्यासाेबत ल्युडो खेळात नेहमी हरणारा मित्र अचानक जिंकू लागल्याने रागात त्याच्या मित्राने त्याला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली.
अमित राज असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
ए. नलावडे व अमित राज हे दाेघे मित्र एकत्र थट्टामस्करी करत ल्युडो हा खेळ खेळायचे. नलावडे हा नेहमी हरायचा. मात्र अचानक ताे खेळात जिंकू लागला. ही बाब अमितला खटकली. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि हाच वाद हाणामारीवर गेला. नलावडे याला अमितने बेदम मारहाण केली. तसाच ताे घरी निघाला, मात्र रस्त्यात अचानक कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नलावडेच्या कुटुंबीयांनी कोरोनाच्या भीतीने शवविच्छेदन न करताच त्याचे अंत्यसंस्कार केले. मात्र, काही दिवसांनंतर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांकडून नलावडेची हत्या झाल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्यांनी २० मार्च, २०२१ रोजी मालाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मालाड पोलिसांनी चौकशीअंती अखेर अमितला अटक केली. यात बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याची माहिती असून, त्याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.
............................