‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 07:06 AM2020-09-24T07:06:56+5:302020-09-24T07:07:26+5:30

संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जितका पाऊस पडतो त्यापैकी ८३ टक्के पाऊस मागच्या बारा तासांत पडला. धारावी, दादर भागात ३३२ मिमी पावसाची नोंद झाली.

‘Kem Cho Worli’; Shivsena on target of flooded mumbai | ‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल

‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना उडाल्यानंतर भाजप आणि मनसेने सत्ताधारी शिवसेनेला खडे बोल सुनावले. पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी सुनावले. तर, वरळीत शिरलेल्या पाण्यावरून ‘केम छो वरळी’ म्हणत मनसेने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.


पावसावर खापर फोडू नका - भाजप
मुंबईतील पाऊस ओसरला तरी पाण्याचा निचरा होत नव्हता, याबाबत चिंता व्यक्त करतानाच कलानगरचे पाणी ओसरले, मुंबईतील अन्य ठिकाणचे पाणी का ओसरत नाही, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका. ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने का चालत नाही, मायक्रो टनेलची कामे वेळेत पूर्ण का झाली नाही, पाण्याचा निचरा होण्यास आताच इतका विलंब का होतो, या प्रश्नांची उत्तरे द्या. मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा. त्यामुळे शांतता राखा, सरकारचे बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे, असा टोलाही शेलार यांनी लगावला. तर, पालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. पालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म आणि मुंबईकर बेहाल, अशी स्थिती असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

‘केम छो वरळी’ म्हणत मनसेचा टोमणा
वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये पाणी शिरल्याने वरळीकरांचे हाल झाले. वरळीतील स्थिती दाखविणारा एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टिष्ट्वटरवर टाकला. या व्हिडिओला ‘केम छो वरळी’, असे कॅप्शन देत देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. वरळीचे आमदार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘केम छो वरळी’चे बॅनर लावले होते.

हा वातावरणीय बदलांचा परिणाम- आदित्य ठाकर

मुंबई : संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जितका पाऊस पडतो त्यापैकी ८३ टक्के पाऊस मागच्या बारा तासांत पडला. धारावी, दादर भागात ३३२ मिमी पावसाची नोंद झाली. वातावरणीय बदलांमुळे दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या टोकाच्या घटना आता नित्याच्या बनल्या आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून नवीन प्रकल्पांची चाचपणी सुरू असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईतील अतिवृष्टी ही वातावरणीय बदलाचा परिणाम असल्याचे ते म्हणाले.

Web Title: ‘Kem Cho Worli’; Shivsena on target of flooded mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.