Join us

केईएम दुर्घटना; त्रयस्थांकडून चौकशी करण्याची स्थायी समितीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:49 AM

दुर्घटनेचा पूर्ण अहवाल पुढच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई : केईएम रुग्णालयातील अति दक्षता विभागात ईसीजी मशीनमध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत प्रिन्स राजभर जखमी झाला होता. मात्र या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असताना ‘हा अपघातच’ असा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाने शुक्रवारी व्यक्त केला. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. प्रिन्सचा मृत्यू झाल्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ पक्षकारांकडून करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली. या दुर्घटनेचा पूर्ण अहवाल पुढच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.केईएम रुग्णालयात ७ नोव्हेंबर रोजी ही दुर्घटना घडल्यानंतर अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या निलंबनाची मागणी होऊ लागली. या प्रकरणाची चौकशी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्यामार्फत सुरू आहे. प्रिन्सचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाल्यामुळे या दुर्घटनेबाबत निवेदन करण्याची मागणी स्थायी समितीत करण्यात आली. मात्र प्रिन्स कुपोषित होता, ईसीजी मशीनमध्ये बिघाड होऊन लागलेली आग हा एक अपघात होता, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिले. यावर तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासन संवेदनाहीन असल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला.या प्रकरणाची चौकशी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांमार्फत करण्यास सर्व सदस्यांनी विरोध दर्शविला. केईएमचे आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता सहकारी असल्याने निष्पक्ष चौकशी कशी होईल, असा सवाल समाजवादीचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी केला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करावी, त्रयस्थ पक्षकारांकडून ही चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली. या दुर्घटनेचा चौकशी अहवाल स्थायी समितीच्या पुढील बैठकीत ठेवण्यात यावा, असे आदेश अध्यक्षांनी या वेळी दिले.मृत्यूचे नेमके कारण काय?प्रिन्स राजभरच्या हृदयाला छिद्र होते, तसेच त्याला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती, त्यात त्याची हृदयक्रिया बंद पडल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला, असे केईएम रुग्णालयातून सांगण्यात आले. मात्र स्थायी समितीमध्ये प्रशासनाने याबाबत केलेल्या निवेदनावर आक्षेप घेत प्रिन्सच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यास सदस्यांनी सांगितले. त्यावर प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.पोलिसांंकडून ईसीजी मशीन जप्तया दुर्घटनेनंतर प्रिन्सचे वडील पन्नेलाल राजभर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात पालिकेविरोधात तक्रार केली आहे. यामुळे ईसीजी मशीनमध्ये बिघाड होऊन आग लागण्यास कोण जबाबदार आहे? याची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत कोणावरही या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. पोलिसांनी ईसीजी मशीन जप्त केले असून न्याय वैद्यक विभागाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

टॅग्स :केईएम रुग्णालय