रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी केईएमच्या डॉक्टरांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:15 AM2019-06-03T01:15:43+5:302019-06-03T01:15:55+5:30
रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांकडून रक्तदान शिबिर : ४६० रुग्णांना थेट फायदा होणार
मुंबई :उन्हाळ्यात जाणवणाऱ्या रक्तसाठ्याच्या तुटवड्यावर उपाय म्हणून केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह, इंटर्न आणि ज्युनियर डॉक्टर एकत्र येऊन रक्तदान केले. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांकडून रक्तदान शिबिर पार पडले.
सार्वजनिक रुग्णालयातील विविध विभागांमध्ये रक्ताचा तुटवडा येतो. अशा वेळी सरकारी रुग्णालये परस्परांच्या रक्तपेढ्यांचा आधार घेत असतात. मात्र, आयत्या वेळी रक्तदानाची व्यवस्था करण्यासाठी डॉक्टरांनाच धावाधाव करावी लागते. शिवाय मुंबईतील सरकारी रुग्णालयांमध्ये रक्ताची गरजही मोठ्या प्रमाणात असते. त्यातून रक्ताची गरज वाढत जाते. शिवाय आॅपरेशन थिएटर, ऑर्थोपेडिक आणि ट्रामा या विभागांमध्ये रक्ताची गरज नेहमीच लागत असते. रक्ताचे आजार असणारे रुग्णदेखील ठरावीक कालावधीनंतर रक्त बदल करत असतात. यात थॅलेसेमिया किंवा ब्लड कॅन्सरसारखे रक्त आजाराचे रुग्ण असतात. एवढ्या गंभीर स्थितीत रक्ताची गरज असताना मात्र, सुट्ट्यांच्या कालावधींमध्ये महाविद्यालये, संस्था, शाळा यांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने या दिवसांमध्ये रक्तपुरवठा कमी प्रमाणात होत असतो. केईएम रुग्णालयात सध्याचा जाणवणारा रक्त तुटवड्याचे हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळेच डॉक्टरांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात एकूण ११५ जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदान किमान चार रुग्णांना मदतपूर्ण ठरते. त्यामुळे या शिबिराने ४६० रुग्णांना थेट फायदा होईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.मनिषकुमार यांनी दिली.