Join us

ज्याचा मेंदू मेला असा रुग्ण लगेच ओळखता येणार, अवयवदान वाढीसाठी केईएम रुग्णालयाचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 1:14 PM

राज्यातील अवयवदान वाढावे, यासाठी वैद्यकीय विश्वासह अनेक राज्यांतील सामाजिक संघटना प्रयत्न करत आहेत.

मुंबई : मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करू शकते. अवयवदान वाढविण्यासाठी रुग्णालयात मेंदूमृत रुग्ण कोण आहेत, याची माहिती योग्य वेळेत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केईएम रुग्णालयाने तीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरात ‘क्रिटिकल केअर एक्स्पर्ट’ या रुग्णालयात नियमितपणे अतिदक्षता विभागात जाऊन पाहणी करणार आहेत. 

राज्यातील अवयवदान वाढावे, यासाठी वैद्यकीय विश्वासह अनेक राज्यांतील सामाजिक संघटना प्रयत्न करत आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णाची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदानात वाढ होणे गरजेचे आहे.

एखाद्या व्यक्तीला मेंदूमृत घोषित करण्यासाठी विविध वैद्यकीय शाखांतील तीन ते चार तज्ज्ञांची गरज असते. त्यांनी मेंदूमृत घोषित करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित असते. रुग्णाला मेंदूमृत घोषित केल्यानंतर प्रत्यारोपण समन्वयक त्या व्यक्तीच्या नातेवाईकाला अवयवदानाविषयी विनंती करतात. हा क्षण खूप हळवा आणि भावूक असतो. अशावेळी नातेवाईकांची मानसिक स्थितीही चांगली नसते. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने त्यांना या गोष्टी सांगाव्या लागतात. त्यानंतर नातेवाईक अवयवदानाविषयी निर्णय घेतात.

‘डोनर मेन्टेनन्स प्रोग्राम’केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, आम्ही या विषयातील तीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना काही विशेष प्रशिक्षणाची गरज असल्यास दिले जाईल. मेंदूमृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर डॉक्टरांना मेंदूमृत रुग्णाच्या आणखी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी काही काळ जातो, तोपर्यंत विविध औषधे द्यावी लागतात, त्याला ‘डोनर मेन्टेनन्स प्रोग्राम’ असे म्हणतात.

टॅग्स :आरोग्य