Join us

सोशल मीडियावर केइएम रुग्णालयाचे ‘पोस्टमार्टेम’, अंकिता प्रभू वालावलकर यांनी मांडली व्यथा

By संतोष आंधळे | Published: June 22, 2023 9:36 AM

अंकिता यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून के. इ. एम रुग्णालयात डॉक्टरांवर असणारा ताण आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गावर भाष्य केले आहे.

मुंबई : सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठावर मालवणी भाषेत माहिती देणारी कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी अंकिता प्रभू- वालावलवकर सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तीन दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत के. इ. एम. रुग्णालयाच्या आरोग्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांवर तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हकिकत मांडली आहे. 

अंकिता यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून के. इ. एम रुग्णालयात डॉक्टरांवर असणारा ताण आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गावर भाष्य केले आहे. अंकिता यांचा परिचय असलेला किरण चव्हाण (वय २३) या तरुणास मेंदूला जबरदस्त दुखापत असल्याने त्यांनी सिंधुदुर्ग येथून १४ जून रोजी केइएममध्ये दाखल केले होते. मात्र, किरणला संपूर्ण दिवस काहीच मदत मिळत नसल्याने त्या रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनी ती परिस्थिती पहिली आणि मदत मिळण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र  नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांना संपर्क साधला आणि केइएम रुग्णालयातील प्रकार सांगितला. 

खोपकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयात स्वतः भेट देऊन प्रशासनाकडे विचारणा केली. त्यानंतर लगेच सर्व चक्रे फिरली आणि किरण यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे या रुग्णाला ज्यावेळी सीटी स्कॅन करण्याची गरज होती, त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना रुग्णालयाचे मशीन काही तांत्रिक कारणामुळे बिघडले असून बाहेर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी बाहेरच्या खासगी सेंटरला जाऊन तो सीटी स्कॅन करून घेतला होता. 

के. इ. एम. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. हरिश पाठक यांनी सांगितले की, काही तांत्रिक कारणामुळे सीटी स्कॅन मशीन बंद होते, त्यामुळे त्यांनी बाहेरून करून घेतला. त्या विषयावरून त्या राग व्यक्त करत आहेत.  गेल्या अनेक वर्षांत अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. 

केवळ माझ्या एका रुग्णाचा प्रश्न नाही. या रुग्णाच्या निमित्ताने रुग्णालयातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था खिळखिळी असल्याचे  चित्र दिसत आहे. यामध्ये डॉक्टरांचा कोणताही दोष नाही. कारण रुग्णसंख्या प्रचंड असून, डॉक्टरांची संख्या त्या तुलनेने खूपच कमी आहे. तसेच परिचारिकांच्या बाबतीत आहे. रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन, ही पदे का भरत नाही हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमधून अनेक रुग्णांचे नातेवाईक पुढे येऊन, आमच्या रुग्णालाही चांगली वागणूक मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.    - अंकिता प्रभू -वालावलकर

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल