मुंबई : मंगळवार सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईकरांचे हाल केले. पण, पावसाचा जोर कमी न झाल्याने मुंबईतील काही भागांमध्ये पाणी साचले. परळच्या केईएम आणि मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयात पाणी साचल्याने काही प्रमाणात रुग्णांचे हाल झाले.परळ भाग सखल असल्यामुळे या परिसरात नेहमीच पाणी साचते. परळच्या केईएम रुग्णालयाच्या तळ मजल्यावर पाऊल भर पाणी दुपारी साचले होते. दुपारी एक नंतरही पावसाचा जोर कमी न झाल्याने साचलेल्या पाण्यात वाढ झाली. केईएम रुग्णालयात तळ मजल्यावर असलेल्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये पाणी शिरल्यामुळे काही प्रमाणात रुग्णांचे हाल झाले. रुग्णांच्या खाटाखाली पाणी आल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची काही प्रमाणात धावपळ झाली.रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून या वॉर्डमधील रुग्णांना वरच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले. रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.मुंबई सेंट्रल परिसरातही मोठा पाऊस झाल्यावर रस्त्यावर पाणी साचते. पावसाचा जोर दिवसभर असल्याने येथील नायर रुग्णालयाच्या परिसरात पाणी साचले होते़
केईएम, नायर रूग्णालय तुडुंब, रुग्णांचे झाले हाल, रुग्णालयात भरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 5:32 AM