मुंबई : मी अनेक रुग्णालयांचे उद्घाटन केले आहे. मात्र, केईएम रुग्णालयातील नूतनीकरण झालेल्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाचे उद्घाटन करणे हा एक वेगळाच अनुभव आहे. ८० वर्षांपूर्वीचे हे म्हातारे रुग्णालय तरुण रुग्णालयाला लाजवेल असे काम करत आहे. एअर कंडिशनसह ७८ रुग्णशय्या असणारा हा देशातला एकमेव आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग असेल. मुंबई महानगरपालिका ही सेवा पुरवत असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.केईएम रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र, काही तांत्रिक बाबी अजूनही पूर्ण झाल्या नसल्याने पुढच्या १५ दिवसांत हा विभाग रुग्णांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याप्रसंगी उद्धव यांनी पुढे सांगितले की, या रुग्णालयाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी अजून सुरकुत्या दिसत आहेत. मात्र, पुढच्या काळात बाहेरून जुनेपण जपून रुग्णालयाला नवीन रूप देण्यात येईल. शिवसेनेचा यासाठी पूर्ण पाठिंबा आहे. डेंग्यूविषयी मुंबईमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे कामगारांनी रजा घेऊ नका, रुग्णांचे हाल होऊ देऊ नका, असे आवाहनही ठाकरे यांनी या वेळी केले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या. उपमहापौर अलका केरकर, खा. अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आ. अजय चौधरी, सुनील प्रभू, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, आयुक्त सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी आणि नगरसेवक उपस्थित होते. १५ दिवसांनी का सुरू होणार?आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागामध्ये ४ आॅपरेशन थिएटर आहेत. हा विभाग एसी करण्याचे प्रमुख कारण म्हणजे जंतुसंसर्ग कमी व्हावा. मात्र, अजूनही इन्फेक्शन कंट्रोलची तपासणी सुरू आहे. ही परवानगी मिळाल्यावरच येथे रुग्ण आणले जाऊ शकतात. सध्या सुरू असलेला आपत्कालीन विभाग येथे हलवायचा आहे. कर्मचाऱ्यांना येथे आणायचे आहे. यानंतरच येथील यंत्रणा कार्यरत होऊ शकते, असे रुग्णालय प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तरूण रूग्णालयाला लाजवणारे ‘केईएम’-ठाकरे
By admin | Published: November 19, 2014 2:16 AM