Join us  

केईएम होणार अधिक ‘स्मार्ट’

By admin | Published: January 21, 2016 3:02 AM

स्वातंत्र्यपूर्व काळात उभे राहिलेल्या परळच्या ‘केईएम’ रुग्णालयाने नव्वदी गाठली आहे. देशभरातील हजारो रुग्णांसाठी आधारवड ठरणारे केईएम रुग्णालय आता कात टाकणार आ

पूजा दामले,  मुंबईस्वातंत्र्यपूर्व काळात उभे राहिलेल्या परळच्या ‘केईएम’ रुग्णालयाने नव्वदी गाठली आहे. देशभरातील हजारो रुग्णांसाठी आधारवड ठरणारे केईएम रुग्णालय आता कात टाकणार आहे. नव्वदीतही अखंड रुग्णसेवेचे व्रत केईएमचे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी टिकवून आहेत. अगदी प्राथमिक आरोग्य सेवांपासून ‘टर्शरी केअर’ही या रुग्णालयात मोफत अथवा अत्यल्प दरात उपलब्ध आहे. शतक महोत्सवी वर्षापर्यंत वाटचाल करताना केईएमला अधिक ‘स्मार्ट’ बनवण्याचे ध्येय असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांपैकी केईएम हे एक महत्त्वाचे रुग्णालय. अख्खी मुंबई निद्रिस्त असतानाही २४ तास ३६५ दिवस केईएमचे डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी कार्यरत असतात. या रुग्णालयाने अनेकांना आधार दिला, जीवनदान दिले. पण एवढ्यावर केईएम थांबलेले नाही. या रुग्णालयाने वैद्यकीय महाविद्यालयातून अत्यंत निष्णात कन्सल्टंट घडविले. नामांकित डॉक्टर या रुग्णालयातून तयार झाले. उत्तम परिचारिका तयार करणारे ठिकाण अशी केईएमची ख्याती झाली. केईएममधून शिक्षण घेतलेल्या परिचारिका परदेशात रुग्णसेवेसाठी जातात. अन्य शिक्षण संस्थांच्या तुलनेत केईएममधून परदेशात जाणाऱ्या परिचारिकांचे प्रमाण अधिक आहे. १सेठ गो.सुं. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना १९२५ साली झाली आणि राजे सातवे एडवर्ड स्मारक रुग्णालय १९२६ साली स्थापन झाले. ९० वर्षांपूर्वी मुंबईत म्हणजे तेव्हाच्या ‘बॉम्बे’मध्ये ‘ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज’ हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय होते. वैद्यकीय पदवी संपादन केलेल्या उच्चशिक्षित भारतीयांना या ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापक आणि डॉक्टर्स म्हणून काम करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्या वेळी इंग्लंडमधून वैद्यकीय पदवी प्राप्त करून भारतात परतलेल्या डॉक्टर्सनी आपले स्वत:चे एक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे ठरवले. याच संकल्पनेतून केईएमचा जन्म झाला. २स्थापन करण्यात येणाऱ्या या महाविद्यालयात मूळचे भारतीय असणाऱ्याच डॉक्टर्स आणि अध्यापकांनाच प्रवेश दिला जाणार होता. १९१० मध्ये राजे सातवे एडवर्ड यांचे निधन झाले. त्या वेळी ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या लोकांनी रुग्णालयासाठी निधी उभा केला, तर ‘गव्हर्नमेंट आॅफ बॉम्बे’ने परळ येथे ५० हजार स्क्वेअर यार्ड इतकी जागा दान केली. त्या वेळी सर पी.एम. मेहता, सर चिमणलाल सेटलवाड आणि सर नारायण चंदावरकर यांनी कौटुंबिक विवाद सोडवण्यास मदत केली. सेठ गोर्धनदास सुंदरदास यांच्या वारसदारांनी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन हवे यासाठी सढळ हाताने दान केले. डॉ. जीवराज मेहता हे संस्थेचे पहिले अधिष्ठाता होते. जॉर्ज विटेटची स्थापत्यकलाकेईएम रुग्णालय आणि जी.एस. महाविद्यालय आजही पाय रोवून भक्कमपणे उभे आहे. ही किमया आहे जॉर्ज विटेट यांची. ९० वर्षांपूर्वी त्यांनीच केईएम रुग्णालयाची बांधणी केली होती. जॉर्ज यांनी मुंबईत १४८ इमारतींचे बांधकामाचे काम केले होते. त्यातच त्याने केईएम रुग्णालयाची उभारणी केली होती. एक रुग्णालय उभारताना लागणारे बारकावे लक्षात घेऊन त्यांनी हे बांधकाम केले होते. त्यामुळे आजही या रुग्णालयात हजारो रुग्ण रोज उपचार घेत आहेत. वाटचालीतले महत्त्वाचे टप्पे १९२८- एम.डी. आणि एम.एस. या अभ्यासक्रमांना मान्यता१९५५- ‘जर्नल आॅफ पोस्ट गॅ्रज्युएट मेडिसीन’ सुरू करण्याचा अधिकार मिळाला. सध्या हे जर्नल देशातील अग्रगण्य जर्नल्सपैकी एक १९६५- देशातील पहिले मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया १९६६- पहिल्या हृदयरोग अतिदक्षता विभागाची स्थापना१९८४-आपत्कालीन चिकित्सालयीन सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रथमच कार्यान्वित १९८६- देशातील पहिल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा जन्म १९८८- एचआयव्ही एड्स सर्व्हिलन्सन विभाग सुरू १९९०- लेव्हल-३ बालरोग आणि नवजात अर्भकांसाठी अतिदक्षता विभागाची स्थापना