मुंबई - मुंबई महापालिकेच्या शेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच राजे एडवर्ड स्मारक(केईएम) रुग्णालयातील लिपिकांची नव्याने पदनाम झालेल्या कार्यकारी सहायक यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. परंतु ही ४० पदे कायमस्वरुपी न भरता कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २४ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ४ वाजेपर्यंत केईएम रुग्णालयातील आवक-जावक विभागात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
केईएम रुग्णालयातील कार्यकारी सहायक अर्थात पूर्वीच्या लिपिक पदांसाठी रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने ९० दिवसांचा करारनामा सापेक्ष भरण्यासाठी स्थानिक जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. या कंत्राटी कार्यकारी सहायक पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि किमान प्रथमच प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तस्सम किंवा उच्च परीक्षा १०० गुणांचा मराठी व १०० गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३८ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षांपेक्षा जास्त वय असता कामा नये. कार्यकारी सहायक (कंत्राटी) पदासाठी दरमहा १८ हजार रुपये एकत्रित वेतन आहे. उमेदवारांच्या प्राप्त केलेल्या गुणांनुसार तथा टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीत नाव असलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी ही मुलाखत व व्यवसाय चाचणीनुसार तयार करण्यात येईल. उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आवक-जावक विभाग, केईएम रुग्णालय असून हा १३ सप्टेंबर २०२१ ते २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ४ विहित कालावधी आहे.