मुंबई : लठ्ठपणा कमी करण्यासाठी महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनाला अखेर यश मिळाले आहे. शरीरातील रक्तवाहिन्यांतून रक्ताचा प्रवाह कमी करून लठ्ठपणा कमी करू शकणारे ‘मेडिकल डिव्हाइस’ केईएमचे अधिष्ठाता आणि रेडिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. हेमंत देशमुख व इंटरर्वेशनल रेडिओलॉजीचे डॉ. क्रांतिकुमार राठोड यांनी तयार केले आहे. अमेरिकन पेटंट ऑफिसनेही या ‘मेडिकल डिव्हाइस’ची दखल घेत पेंटंट बहाल केले आहे.
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या परळ येथील केईएम रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व डॉ. क्रांतिकुमार राठोड यांनी २०१६ पासून रक्तवाहिन्यांच्या आजारांवर संशोधन सुरू केले. त्यानुसार तयार केलेल्या मेडिकल डिव्हाइसअंतर्गत रक्ताचा प्रवाह कमी केल्यास लठ्ठपणा कमी करता येईल, याबद्दलचे संकल्पित नमुने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसकडे दाखल करण्यात आले होते. अमेरिकन पेंटंट ऑफिसने ही संकल्पना जगात एकमेव असल्याचे मान्य करीत पेटंट बहाल केले. या मेडिकल डिव्हाइसनुसार स्थूलपणावर उपचार करण्यासाठी संशोधन सुरू राहणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संशोधन व यशाबाबत संबंधित डॉक्टरांचे अभिनंदन केले.