केईएमचा वैद्यकीय सेवा विभाग 'अनफिट'

By admin | Published: December 4, 2014 01:34 AM2014-12-04T01:34:26+5:302014-12-04T01:34:26+5:30

परेल येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात येणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, म्हणून अद्ययावत वैद्यकीय सेवा विभाग तयार करण्यात आला.

KEM's medical service department 'unfriendly' | केईएमचा वैद्यकीय सेवा विभाग 'अनफिट'

केईएमचा वैद्यकीय सेवा विभाग 'अनफिट'

Next

पूजा दामले, परळ
परेल येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात येणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, म्हणून अद्ययावत वैद्यकीय सेवा विभाग तयार करण्यात आला. मोठ्या थाटात १८ नोव्हेंबर रोजी या विभागाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा तांत्रिक कामे पूर्ण न झाल्याने हा विभाग रुग्णांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. आता तब्बल १५ दिवसांनंतरही वैद्यकीय सेवा विभाग ‘अनफिट’ असल्यामुळे रुग्णांसाठी खुला करण्यात आलेला नाही.
महापालिका मुंबईकरांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी कार्यरत आहे. नवीन सुविधा प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य तो वेळ न घेता उद्घाटनाची घाई महापालिका दरवेळीच का करते, अशी चर्चा आता रंगली आहे. जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर आणि जुहू येथील कूपर रुग्णालयांचे उद्घाटनदेखील अशाच थाटात करण्यात आले होते. उद्घाटन होऊनही या रुग्णालयांत परिपूर्ण आरोग्य सेवा देणारी यंत्रणा उपलब्ध नव्हती. तीच गत आता केईएममधील वैद्यकीय सेवा विभागाची झालेली आहे.
केईएम रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवा विभागात एअर कंडिशनर बसवण्यात आले आहेत. एसी बसवण्याचे प्रमुख कारण म्हणजे जंतूसंसर्ग कमी व्हावा, हे आहे. पण इन्फेक्शन कंट्रोलकडून परवानगी मिळाल्यानंतरच हा विभाग सुरू करता येणार असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले होते. सध्या इन्फेक्शन कंट्रोल तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
जंतूसंसर्ग रोखणारी यंत्रणा येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या काही तपासण्याही झालेल्या आहेत. पण जोवर या तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह येत नाही, तोवर जंतूसंसर्ग होणार नसल्याची खात्री देता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र अजूनही या तपासण्या पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे या विभागात रुग्णांना हलवणे धोक्याचे आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळेच आता अजून किमान ४ ते ५ दिवस हा विभाग सुरू होणे शक्य नसल्याचेच समजते. पुढचे काही दिवस रुग्णांना या विभागात उपचार घेण्यासाठी वाट पाहण्याशिवाय कोणतेही गत्यंतर नाही.

Web Title: KEM's medical service department 'unfriendly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.