मुंबई : केईएम रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग इमारतीचे काम पुढच्या काही दिवसांत सुरू होणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून बाह्यरुग्ण विभाग एसी कंटेनरमध्ये हलवण्यात येणार आहे. महापालिका रुग्णालयात हा प्रयोग प्रथमच केला जाणार आहे. रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून एसी कंटेनरचा पर्याय निवडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बांधकामाच्या ठिकाणी प्रामुख्याने कार्यालय म्हणून अशा एसी कंटेनरचा वापर करण्यात येतो. पहिल्या मजल्यावरील बाह्यरुग्ण विभाग पुढच्या काही दिवसांत या कंटेनरमध्ये हलवण्यात येणार आहे. दंत, न्यूरोलॉजी आणि मानसोपचार हे पहिल्या मजल्यावरील बाह्यरुग्ण विभाग कंटेनरमध्ये हलवण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावरील बाह्यरुग्ण विभागांचे नूतनीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले आहे, पण दुसऱ्या मजल्याचे काम पुढच्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्या वेळी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बाह्यरुग्ण विभाग असलेल्या दुसऱ्या मजल्याची डागडुजी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, या मजल्यावर सेमिनार हॉल आणि ‘मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट’ सुरू करण्यात येणार आहे. याचे बांधकाम सुरू झाल्यावर धूळ, सिमेंट उडेल. त्याचबरोबर, यंत्रांचे आवाज, सतत ये-जा करणारे कामगार, यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे. निवासी डॉक्टर वसतिगृहाच्या इमारतीजवळ सध्या एक कंटेनर ठेवण्यात आला आहे. या कंटेरनच्या आजूबाजूला मंडप घालण्यात येणार आहे. या ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची बसण्याची सोय करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
केईएमची ओपीडी एसी कंटेनरमध्ये
By admin | Published: September 14, 2016 6:26 AM