Join us

तीन कोटींच्या कोकेनसह केनियन नागरिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 6:04 AM

मुंबई उपनगरात कोकेन या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी (केनियन) नागरिकाला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

मुंबई : मुंबई उपनगरात कोकेन या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी (केनियन) नागरिकाला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी (एएनसी) पथकाच्या वांद्रे युनिटने ही कारवाई केली असून त्याच्याकडून ३ कोटी ६ लाखांचे कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.डेव्हिड लेमरोन ओई तुबुलइ (३३) असे अटक केलेल्या या विदेशी नागरिकाचे नाव आहे. तो मूळचा केनियातील इम्बकासी येथील रहिवासी असून सध्या नवी मुंबईतील कोपरखैरणे विभागात राहत होता. शुक्रवारी संध्याकाळी खार पश्चिम येथील कार्टर रोडजवळील हिंदू स्मशानभूमी परिसरात वांद्रे एएनसी विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, पोलीस उपनिरीक्षक पवळे आणि त्यांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना त्या परिसरात हातात हिरव्या रंगाची पिशवी घेतलेली एक परदेशी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. संशय बळावल्याने त्यांनी त्याला हटकत त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे असलेल्या पिशवीत ५१० ग्रॅम कोकेन आढळले. संबंधित कोकेन हे अत्यंत महागडे असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ३ कोटी ६ लाख असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जुहू, वर्सोवा आणि खार परिसरात कोकेन पुरवणारा तुबुलइ हा मुख्य आरोपी असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याच्याविरोधात वांद्रे एएनसी विभागाने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :अटक