Join us

धक्कादायक! मुंबई विमानतळावर महिलेच्या शॅम्पूमध्ये सापडले २० कोटींचे कोकेन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:28 PM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर डीआरआय अधिकाऱ्यांनी एका महिलेला अटक केली.

Mumbai Airport : सीमाशुल्क विभागाने गेल्या काही दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबईविमानतळावरुन अनेक तस्करीचे प्रकरणे उघडकीस आणली आहेत. अशातच आता मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने नैरोबीहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिच्याकडे असलेल्या सामानाची कसून तपासणी केली असता अधिकाऱ्यांना धक्का बसला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी महिलेकड एक संशयास्पद पदार्थ सापडला.

तपासणीदरम्यान, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना महिलेच्या बॅगेत दोन शॅम्पू आणि लोशनच्या सापडल्या. या बाटल्यांमध्ये १,९८३ ग्रॅम वजनाचे चिकट द्रव आढळून आले. या द्रव्याची चाचणी केल्यावर हा चिकट पदार्थ नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा, १९८५ अंतर्गत बंदी घालण्यात आलेलेकोकेन असल्याचे समोर आलं. आरोपी महिला चतुराईने लिक्विड कोकेनचे शॅम्पू किंवा लोशनच्या स्वरुपात तस्करी करत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना हे शोधणे  आव्हानात्मक होते.

जप्त केलेल्या कोकेनची अंदाजे किंमत अंदाजे २० कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या महिला प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनापूर्वी सापडले दोन कोटींचे एमडी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ऐरोली टोलनाक्यावर करण्यात आलेल्या नाकाबंदीत दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. नवघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून दोन किलो एमडी आणि गाडी जप्त केली आहे. नाकाबंदीदरम्यान, पोलिसांनी अमली पदार्थ चाचणी कीटच्या सहाय्याने गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीत दोन किलो २९ ग्रॅम एमडी सापडले. ही पिवळसर पावडर एमडी असल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :मुंबईविमानतळगुन्हेगारीपोलिस