रात्रभर तिला व्हिडिओ कॉलसमोर बसवून ठेवले; हादरवणारी घटना, नेमके प्रकरण काय? वाचाच
By अतुल कुलकर्णी | Published: December 30, 2023 05:50 AM2023-12-30T05:50:44+5:302023-12-30T05:52:14+5:30
...आणि काही तास तिने जीवघेण्या दडपणाखाली घालवले.
अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : संध्याकाळच्या सुमारास मुंबईत एका मुलीला फोन आला. तुम्ही अमुक कंपनीकडून पार्सल मागवले होते. तुमच्या पार्सलमध्ये वीस डुप्लिकेट पासपोर्ट, दीडशे ग्रॅम ड्रग्स आहेत. आम्ही तुम्हाला हाऊस अरेस्ट करत आहोत. तुमचा मोबाईल चालू ठेवा, असे त्या मुलीला फोनवर सांगण्यात आले... आणि पुढचे काही तास तिने जीवघेण्या दडपणाखाली घालवले.
त्या मुलीला मोबाईल फोनवर कॉल आला. तुम्ही जर काही केले नसेल तर तुम्हाला लखनऊ पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी लागेल. मी तुम्हाला फोन नंबर देतो. तुम्ही तिथे फोन करून तक्रार द्या. मी माझा फोन चालूच ठेवतो, असेही त्या व्यक्तीने सांगितले. मुंबईत बसलेल्या या मुलीने फोन लागत नाही असे सांगितल्यानंतर मी तुम्हाला जोडून देतो, असे म्हणत त्याने तुम्ही ‘स्काइप’वर या, म्हणजे तुमची तक्रार दाखल करून घेता येईल, असे सांगितले. व्हिडिओ कॉल लागल्यानंतर समोर पोलीस स्टेशनमधील वातावरण दिसत होते. पोलिसांच्या गणवेशातला एक माणूस तिच्याशी बोलत होता. कुठल्याही पोलीस स्टेशनला जसे चित्र असते तसेच त्या व्हिडिओमध्ये तिला दिसत होते. पाेलिस स्टेशन पाहून ही मुलगी रडू लागली. तेव्हा तिच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीने तू पाणी पी, काळजी करू नकोस... आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे सांगणे सुरू केले. बोलणारा माणूस तिच्याशी अत्यंत प्रेमाने बोलत होता.
मी तुझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करून देतो. तू थांब, असे म्हणत व्हिडिओ कॉल चालू ठेवत तो दुसऱ्या व्यक्तीच्या केबिनमध्ये जात त्या मुलीचा फोन असल्याचे सांगितले. ते ऐकताच या मुलीशी प्रेमाने बोलणाऱ्या त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने झापायला सुरुवात केली. तिला तातडीने अटक करायची आहे. तिच्याविरुद्ध गंभीर गुन्हे आहेत, असे म्हणत त्याने काही कलमे सांगितली. व्हॉट्सअपवर काही बोगस डॉक्युमेंटही तिला पाठवले गेले. घरात कुणाला सांगितले, तर त्यांच्याविरुद्ध हीच कलमे लावली जातील. मुंबई पोलिसात गेलीस तर मुंबई पोलीस तुलाच अटक करतील. वकिलाला सांगितले तर त्यांच्यावरही कलमे लावली जातील, असेही सांगितले गेले.
घरात एकटी राहणारी ती मुलगी ते ऐकून ओक्साबाेक्सी रडू लागली. तिचे डोके चालेनासे झाले. त्याचा फायदा घेत तिला प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॉल चालू ठेवूनच तिला बसवले. उशिरापर्यंत हे सुरू होते. रडून रडून थकलेल्या त्या मुलीला झोप लागली... आणि व्हिडिओ कॉल कट झाला. सकाळी जाग आल्यानंतर मुलीने घाबरून पुन्हा त्या नंबरवर फोन केला. तेव्हा त्यातल्याच एकाने तिला हळू आवाजात सांगितले की हे सगळे बोगस आहे. तुझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सुरू आहे. मला तुझी दया आली म्हणून सांगतोय... तू हा फोन ब्लॉक कर. तेव्हा या जबरदस्त धक्क्याने ती मुलगी प्रचंड कोलमडून गेली. या घटनेला चार-पाच दिवस झाले. मुलीने जुने सिम कार्ड काढून नवे सिम कार्ड तिच्या फोनमध्ये टाकले तेव्हा दुसऱ्या नंबरवरसुद्धा तिला धमकीचे फोन येणे सुरू झाले...
न मागवलेल्या कुरिअरचा फटका
एका ऑफिसमध्ये ब्लू डार्ट कंपनीमधून कुरियर आले. ज्याच्या नावाचे पार्सल होते ती व्यक्ती ऑफिसमध्ये नव्हती. ऑफिसच्या लोकांनी सहानुभूती म्हणून पार्सल ठेवून घेतले. कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळे अडीच हजार रुपये मागितले. मित्रांनी पैसे कुरियरवाल्याला दिले. ज्याचे कुरिअर होते तो ऑफिसमध्ये आला व त्याने पार्सल उघडले. आतमध्ये फाटका, मळका शर्ट निघाला. कंपनीकडे चौकशी केली तेव्हा हे पार्सल आमचे नाहीच असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हेज पुलाव आहे, दीड हजार द्या
एका पत्रकाराच्या घरी स्विगीमधून पार्सल घेऊन आलेल्या मुलाने तुम्ही व्हेज पुलाव मागवला आहे. त्याचे दीड हजार रुपये द्या असे सांगितले. त्याच्या मुलीने वडिलांना फोन करून तुम्ही व्हेज पुलाव मागवला आहे का? असे विचारले. मी ऑफिसमध्ये आहे, असे तिच्या वडिलांनी मुलीला सांगितले. तेव्हा पार्सल वाल्याने किटकिट करत बाहेरचा रस्ता धरला. त्या मुलीने हुशारी दाखवली म्हणून त्यांचे दीड हजार रुपये वाचले.
लोकमतचे आवाहन
एका रात्रीत हादरून गेलेल्या त्या मुलीचे म्हणणे मुंबई पोलिसांनी सहानुभूतीने ऐकून घेतले. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने त्या मुलीला दिलासा दिला. बसलेल्या मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यासाठी तिला मदत केली. तिच्याकडून एक अर्ज लिहून घेतला. तुम्हाला जर असे फोन आले तर घाबरून जाऊ नका. तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क करा. तुम्ही राहता त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनचा नंबर तुमच्या घरात लिहून ठेवा. लोक जेवढे सतर्क होऊन पुढे येतील, तेवढे हे प्रकार नियंत्रणात राहतील हे लक्षात ठेवा.