तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात ओएनजीसीच्या पी-३०५ बार्ज तराफा दुर्घटनेत आपल्या ३६ वर्षीय मुलाला गमावलेल्या वडिलांनी एक नवा आदर्श ठेवला आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सानीश जोसेफ याच्या वडिलांनी ओएनजीसी कंपनीनं जाहीर केलेली दोन लाख रुपयांची मदत दान करायची ठरवलं आहे. यातील ५० टक्के म्हणजेच १ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि उर्वरित १ लाख रुपये त्यांच्या मूळ गावी केरळ येथे एक ग्रंथालय उभारण्यासाठी देणार असल्याचं म्हटलं आहे. (Kerala barge victims dad to donate entire compensation)
सानीश याचा दुर्घटना होण्याआधी दोनच दिवसांपूर्वी बार्जवर सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला होता. या महिन्याच्या अखेरीस तो घरी परतणार होता. पण तौत्के वादळाच्या दुर्घटनेत सानीश याला जलसमाधी मिळाली.
"माझ्या वडिलांनी ओएनजीसीकडून मिळालेली आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि आमच्या गावी म्हणजेच केरळमधील कन्नुर येथे सुवर्ना आर्ट आणि स्पोट्स क्लब येथे ग्रंथालय उभारण्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे", अशी माहिती सानीशचा भाऊ अनेश यानं दिली. सानीशचे वडील टीटी जोसेफ यांनी घेतलेल्या या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही सामाजिक भान राखत जोसेफ यांनी दाखवलेला दानशूरपणा खरंच वाखाणण्याजोगा आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे घडलेल्या ओएनजीसीच्या बार्ज पी - ३०५ दुर्घटनेत आतापर्यंत ६१ मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यापैकी ३१ मृतदेहांची ओळख पटली असून, २८ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अन्य मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, सर्वांचे डीएनए नमुनेही घेण्यात येत असल्याचे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले आहे.