मुंबई - केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्यावर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. त्यामुळे केरळला सर्वच राज्यांकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारनेही तातडीची बैठक घेऊन 20 कोटी मदत जाहीर केली आहे. त्यातच, आता भाजप नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपली 1 महिन्यांची पगार केरळसाठी मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच इतरही आमदार-खासदारांना 1 महिन्याचा पगार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केरळमध्ये आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर राज्य सरकारने 11 जिल्ह्यांना एक दिवसाचा अतिदक्षतेचा इशारा दिला असून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असू सर्वच राज्यांकडून मदतीचा ओख सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर, भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपली आणि केडीएमसी महापालिकेतील नगरसेविकांनी एक महिन्याचा पगार केरळसाठी दिल्याची घोषणा केली. तसेच डोंबिवलीकरांनीही 'सेवा भारती केरळम' या संस्थेला मदत करुन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. यासंदर्भात माहिती देताना विखे पाटील यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत. केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या समवेत शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
तर, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपला एक महिन्याचा पगार केरळच्या मदतनिधीसाठी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे. तसेच संसदेतील इतर सहकाऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार व नगरसेवकांनी आपला एक महिन्याचा पगार केरळसाठी द्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, केरळला देशभरातून मदत करण्यात येत आहे. सर्वच राज्यातील राज्यांनी आपआपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे. तर, आपत्ती निवारण आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे. आजच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळला भेट दिली.