Join us

2024 ला केसरकरांनी जेलमध्ये जायची तयारी ठेवावी, संजय राऊतांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 11:41 AM

सध्या शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे

मुंबई - शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे शिंदे गटावर सातत्याने टिका करतात, त्याला शिंदे गटाचे आमदार, नेते आणि प्रवक्तेही प्रत्युत्तर देतात. नुकतेच मंत्री दिपक केसरकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना, संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यावर, आता संजय राऊत यांनी केसरकरांना थेट इशारा दिलाय. २०२४ ला केसरकरांनीच तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असे राऊत यांनी म्हटले.  

सध्या शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पुर्ण कल्पना आहे आणि आम्ही अधिकृत माहीती दिली आहे. त्यास, कोणाचा विरोध आहे हे भविष्यात कळेल. मात्र,  प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले तर परिवर्तनाची नांदी आहे. शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र यावे ही आमची इच्छा होती. जर देशातील आणि राज्यातील सत्ता उलथवायची असेल तर भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर, दिपक केसरकर यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिले.  

संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जायचंय का? यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी तुरूंगात जाऊ, आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत, तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही, तुम्ही म्हणजे कायदा नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दिपक केसरकरांवर पलटवार केला. तसेच, केसरकर खरंच असं बोलले असतील तर २०२४ ला त्यांनी तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत येत आहेत, त्याबद्दल संजय राऊत यांना विचारल असता, योगी मुंबईत येत आहेत, त्यांचे स्वागत आहे. पण त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा जावं, असेही त्यांनी म्हटलं.   

टॅग्स :संजय राऊतदीपक केसरकर शिवसेनातुरुंग