Join us

Keshav Upadhye: 'भानगडी करणारेच सरकारमध्ये होते तर कशाला ईडी कारवाई करेल?'; भाजपाचं पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 2:45 PM

Keshav Upadhye: पूर्वीच्या काळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तर कशाला ईडी कारवाई करेल?, केशव उपाध्ये यांचा टोला

Keshav Upadhye: राज्यातील नेत्यांना नाहक त्रास देण्यासाठीच ईडीच्या कारवाया सुरू असून याआधी एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया कधी पाहिल्या होत्या का?, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यावर आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? असं म्हणतात. पण पूर्वीच्या काळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तर कशाला ईडी कारवाई करेल?", असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. 

एकाचवेळी 'ईडी'च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? शरद पवारांचा हल्लाबोल

शरद पवारांनी पुण्यातील एका नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमात राज्यात ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. राज्यातील नेत्यांना ईडीच्या कारवायांमधून नाहक त्रास दिला जात असल्याचं शरद पवार म्हणाले. केशव उपाध्ये यांनी पवारांच्या विधानाबाबत एक ट्विट केलं आहे. 

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? पूर्वीच्याकाळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तर कशाला ईडी कारवाई करेल? बिनदिक्कत सुरू होतं. कारण सैयां भये कोतवाल, अब डर काहे का? आता परिस्थिती बदलली त्यामुळे कारवाया होत आहेत", असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. 

काय म्हणाले शरद पवार?'ईडी'कडून नाहक त्रास देण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे. याआधी ईडीच्या कारवाया तुम्ही कधी पाहिल्या होत्या का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईडीकडून सुरू असलेल्या कारवाया केंद्र सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप पवारांनी यावेळी केला आहे. ते पुण्यात एका नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीकडून धाड टाकण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शरद पवार यांनी भावना गवळी यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटलं. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करुन केंद्र सरकार संपूर्ण देशभर व राज्यात अनावश्यक त्रास देण्याचं काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम असल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :शरद पवारभाजपा