केशवजी नाईक चाळ जपतेय लोकमान्यांचा वारसा!
By Admin | Published: August 7, 2016 03:16 AM2016-08-07T03:16:06+5:302016-08-07T03:16:06+5:30
गेल्या काही वर्षांपासून सणासुदींचे ‘इव्हेंट’ झाले आणि मग त्यातील मूळ उद्देश हरवत गेला. ज्या उद्देशाने सण-उत्सव साजरे केले जायचे त्यांची जागा डीजेच्या दणदणाट, नृत्याचा धिंगाणा, मंडळांमध्ये
- गेल्या काही वर्षांपासून सणासुदींचे ‘इव्हेंट’ झाले आणि मग त्यातील मूळ उद्देश हरवत गेला. ज्या उद्देशाने सण-उत्सव साजरे केले जायचे त्यांची जागा डीजेच्या दणदणाट, नृत्याचा धिंगाणा, मंडळांमध्ये वाढणारी ठसन आणि प्रसिद्धीच्या जागेने घेतली. मात्र या सगळ्यात आजही शहर-उपनगरातील काही सार्वजनिक उत्सव मंडळे सण-उत्सवांचे महत्त्व जाणून पारंपरिक पद्धतीने, साधेपणाने, समाजाभिमुख कार्य करीत आणि मूळ उद्देश जपत व जोपासत सण साजरे करीत आहेत. अशाच काही पारंपरिक आणि लोकमान्यांचा वारसा चालविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आपण ओळख करून घेणार आहोत. तुमचे गणेशोत्सव मंडळही अशा प्रकारे विधायक आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरा करीत असेल तर okmatmumbai1@gmail.com या ई मेल आयडीवर आम्हाला जरूर कळवा.
मुंबई : ‘इव्हेंटीकरण’ झालेल्या काळात आजही शहर-उपनगरातील काही मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करीत आहेत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला त्या उद्देशाचा आदर्श ठेवून परिपूर्ण उत्सव साजरा करण्याची परंपरा गिरगावातील केशवजी नाईक चाळीने जोपासली आहे.
१८९३ साली सुरू झालेल्या गणेशोत्सवाने १२३ वर्षे उलटल्यानंतरही उत्सवाच्या मूळ उद्देशाची कास सोडलेली नाही.
जगभरात हा उत्सव ‘के.ना. चाळीचा गणपती’ या नावानेच प्रसिद्ध आहे. या मंडळाची सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे मंडळाचे कामकाज आजही १९३५ साली अस्तित्वात आलेल्या घटनेनुसारच चालते.
डीजेचा दणदणाट, प्रसिद्धीच्या वलयात आणि गगनाला भिडलेल्या मूर्तीच्या उंचीत या
मंडळाने उत्सवाचे साधेपण आजही जपलेले आहे. (प्रतिनिधी)
व्याख्यानमाला, निबंध स्पर्धांचा वारसा...
पूर्वीच्या काळात जनजागृती करण्यासाठी नाटके आणि लोकनाट्य याची परंपरा मंडळाने सुरू केली. गेल्या काही वर्षांत कार्यक्रमांचे स्वरूप बदलले; मात्र गाभा कायम आहे.’ १९८८पासून सलग १४ वर्षे अतिशय गाजलेली पाच दिवसांची व्याख्यानमाला के.ना. चाळ गणेशोत्सव मंडळाने चालविली होती. या व्याख्यानमालांनंतरच्या सात वर्षांत के.ना. चाळ गणेशोत्सवाने आयोजित केलेल्या विविध विषयांवरच्या निबंध स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अगदी भाभा अणुसंशोधन केंद्रांतील संशोधकांनीही या निबंध स्पर्धांत स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.
साधेपणा हेच उत्सवाचे वैशिष्ट्य
सध्या मंडळाच्या बैठका घेऊन कार्यक्रमांची आखणी करण्यात सर्व व्यस्त आहोत. आजपासून मांडव उभारणीचे काम सुरु होणार आहे, त्यानंतर इतर कामांना वेग येईल. विशेष म्हणजे यात तरुणवर्गही आवर्जून सहभाग घेतो याचे समाधान आहे. केवळ यंदाचा नव्हे,
तर दरवर्षी साधेपणातील वेगळेपण जपण्याचा मंडळाचा प्रयत्न
असतो.
- विनय राहतेकर, विश्वस्त, केशवजी नाईक चाळ
आरोग्याचीही तितकीच काळजी
के.ना. चाळ गणेशोत्सवातर्फे नैमित्तिक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाते. यात आरोग्यासोबतच दृष्टी, दंत तपासणी, विशेष बुद्धिमत्ता चाचणी, फिजिओथेरपी, स्त्रीरोग, अस्थिव्यंग चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा विविध रोगांविषयी विशेष तज्ज्ञ शिबिरांचे आयोजन होते.
यापैकी प्रत्येक शिबिरातून गरजू रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले जाते. संस्थेतर्फे युवा रक्तदात्यांची सूची तयार केली गेली असून, गरज असेल तसे परिसरातील युवक रक्तदान करतात.
पुस्तिकांचे शाळांत वाटप
मंडळाने शालेय मुलांसाठी ‘ओळख महाराष्ट्राची’ ही वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नस्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या
सर्वांकष माहितीवर आधारित १५०० प्रश्नांची पुस्तिका मुद्दाम तयार करवून
घेऊन ती शाळाशाळांमध्ये वाटण्यात आली होती.
तमसोऽ मां ज्योतिर्गमय
या कार्यक्रमांतर्गत, पूर्ण आयुष्य समाजाला किंवा एखाद्या विषयाला वाहून घेतलेल्या एका व्यक्तीवर व्याख्यान आयोजित करून त्याच्या कार्याचा परिचय करून दिला जातो. त्या कार्यक्रमानिमित्त त्या विशिष्ट कार्याला जमेल ती आर्थिक मदत दिली जाते.
गणेशोत्सवाची वाटचाल ग्रंथस्वरूपात
१९९२मध्ये मंडळाने अतिशय मेहनत घेऊन प्रसिद्ध केलेला ‘सार्वजनिक गणेशोत्सवाची वाटचाल’ हा ग्रंथ सार्वजनिक गणेशोत्सवावरील संदर्भग्रंथच मानला जातो. अशा प्रकारची तपशीलवार माहिती व छायाचित्रे संकलित केली आहेत.
ढोल पथकाची वेगळी ओळख
के.ना. चाळ गणेशोत्सव मंडळाने स्वत:चे पारंपरिक ढोल पथक उभे केले आहे. के.ना. चाळीतीलच युवक-युवतींचे हे शिस्तबद्ध ढोल पथक हे दरवर्षी गणेश मिरवणुकीचे वैशिष्ट्य
बनते.