मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमांतून आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, गोरेगाव पोलिसांनीही केतकीच्या कोठडीची मागणी केली असून ते तिचा ताबा घेणार आहेत. मात्र, तत्पूर्वीच रबाळे पोलिसांनी केतकीचा ताबा घेतला आहे. केतकीवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांना केतकीच्या जामिनाबाबतीत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सांगावे असं न्यायालयाने सांगितले. तोपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केवळ सायबर कलम ६६ अ अन्वये युक्तिवाद झाला आहे. केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी बाजू मांडली. न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, केतकीचा ताबा देण्यात आला नव्हता. आता, रबाळे पोलिसांनीची केतकीचा ताबा घेतला आहे.
काय आहे प्रकरण
केतकीनं १ मार्च 2020 रोजी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं अनेक धर्मांचा उल्लेख केला आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क'. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.' नवबौद्धांसंदर्भातल्या वाक्यावर आक्षेप घेत स्वप्निल गोविंद जगताप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरुनच आता केतकीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की 'मुसलमान, क्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू' असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय, असंदी केतकीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे, अशी शेवटची ओळही केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिली होती.