मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेला महागात पडली आहे. केतकीला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस केतकीच्या पोस्टचा तपास करत आहेत. या तपासातून महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे.
केतकी चितळेनं पवारांबद्दल केलेली पोस्ट याआधी २०२० मध्ये व्हायरल झाली होती. त्यावेळी ती केतकीनं पोस्ट केली नव्हती. शरद पवारांबद्दल द्वेष पसरवण्याच्या उद्देशानं १८ जानेवारी २०२० रोजी पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवरील काही ग्रुप्समध्ये ती पोस्ट फॉरवर्ड करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आल्याचं वृत्त एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
दोन वर्षांपूर्वी शरद पवारांबद्दल करण्यात आलेली पोस्ट अपेक्षित व्हायरल झाली नाही. त्यामुळे आता ती केतकी चितळेच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली. केतकी चितळे अनेकदा वादात सापडली आहे. पवारांबद्दलची पोस्ट तिनं केल्यानंतर गदारोळ झाला. त्यामुळे २ वर्षांपूर्वी जे घडलं नाही, ते आता घडलं. हे घडवण्यासाठीच २ वर्षांपूर्वीची पोस्ट केतकीनं रिपोस्ट केली होती, अशी माहिती तपासानू पुढे आली आहे.
केतकी चितळेनं आता केलेली पोस्ट २ वर्षांपूर्वीच काही फेसबुक, व्हॉट्स ऍपवर फिरत होती. मात्र ती अपेक्षित व्हायरल झाली नाही. केतकी चितळे वादग्रस्त अभिनेत्री असल्यानं तिनं रिपोस्ट करताच वातावरण तापलं. या सगळ्यामागे नेमकं कोण आहे, केतकी चितळे केवळ प्यादं आहे का, तिने कोणाच्या सांगण्यावरून पोस्ट केली का, सध्याचं तणावपूर्ण वातावरण पाहता हे सगळं मुद्दाम घडवण्यात आलं का, या प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस शोधत आहेत.