- मनोज गडनीसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दैनंदिन धबडग्यात कशाच्या मागे किती लागायचे आणि ते करताना त्यात किती हरवून जायचे, याचे प्रत्येकाचे काही आराखडे असतात; पण अशा वेळी आपल्याला स्वतःला काय करायचे आहे आणि ते आपण करतो का, हा विचार मागे पडतो; पण आपल्याला जे करायचे आहे, ते करायचेच आणि त्याकरिता लागेल ती किंमतही मोजायची, अशी हिंमत जो दाखवतो आणि तशी कृती करतो, तो निखळ समाधानाचे आयुष्य जगतो. अशा व्यक्तींचे समाधान, त्यांची कृती ही मात्र केवळ चर्चेचा विषय नसतो तर ती कृती इतरांना प्रेरणा देऊन जाते. याची प्रचीती नेरळमध्ये वृदांवन नावाचा कृषी पर्यटन प्रकल्प साकारणाऱ्या केतकी भडसावळे-म्हसकर यांना भेटले की आवर्जून येते.
तीनही ऋतूंचा समृद्ध वारसा लाभलेल्या कर्जत नजीकच्या नेरळमध्ये वाढलेल्या केतकीने न्यूट्रिशनिस्टचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. कालौघात विवाह झाला आणि थेट तिचे वास्तव्य केनियात सुरू झाले. दीडेक वर्ष तिथे राहिल्यानंतर सुरक्षिततेच्या मुद्यावरून उभयतांनी पुन्हा घरवापसी केली. भारतात आल्यानंतर काही काळ मुंबईत वास्तव्यही केले. त्या काळात केतकीचे क्लिनिकही उत्तम सुरू होते. मात्र, नेरळमधील निसर्ग तिला सतत खुणावत होता. केतकी म्हणाली, शहरातून गावात जाण्याचा निर्णय कठीण होता; पण ज्या निसर्गात मी वाढले त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. कितीही अचडणी आल्या तरी आपण तिथे (च) उत्तम उभे राहू शकतो ही खूणगाठ मी बांधली आणि मी पुन्हा नेरळ गाठले. एका टेकडीवर आम्ही जमीन घेतली होती. शून्यातून सारे उभे करायचे होते. माझे वडील चंद्रशेखर भडसावळे यांनी सगुणाबाग अशीच उभी केली होती. त्याच प्रेरणेतून मी वृंदावन साकारले.
विविध वस्तूंची निर्मितीटेकडीवर घर बांधण्यासाठी दगडमाती न्यायची म्हटली तरी ते सारे कष्टप्रद होते; पण आव्हान स्वीकारायचे ठरले, मग मागे हटलो नाही. आज तिथे आम्ही वृंदावन या नावाने छोटेखानी कृषी पर्यटन प्रकल्प साकारला आहे.अनेक पर्यटक आमच्याकडे हक्काच्या निवाऱ्यासाठी येतात. हिवाळ्यात आम्ही छानसे कॅम्पिंगही आयोजित करतो. केवळ शेती करून फारसे अर्थकारण साकारता येणार नाही, हे लक्षात आल्यावर आम्ही रानोमाळात मिळणाऱ्या घटकांपासून विविध वस्तूंची निर्मिती करण्यास सुरुवात केली. आता त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे; पण, या निर्णयामागे माझे पती अनंत, मुले आणि सर्वच कुटुंबीय भक्कमपणे उभे राहिले आणि साथ देत आहेत, ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे, असे केतकीने आवर्जून नमूद केले.