योग्य उमेदवार ठरणार कळीचा मुद्दा
By admin | Published: November 18, 2016 04:19 AM2016-11-18T04:19:21+5:302016-11-18T04:19:21+5:30
लालबाग, परळ, शिवडी, नायगाव आदी मराठमोळ्या भागाचा समावेश असणाऱ्या एफ साउथ वॉर्ड ओळखला जातो
गौरीशंकर घाळे / मुंबई
लालबाग, परळ, शिवडी, नायगाव आदी मराठमोळ्या भागाचा समावेश असणाऱ्या एफ साउथ वॉर्ड ओळखला जातो तो आपल्या मराठी अस्मितेच्या राजकारणासाठी. या वॉर्डाने कायमच शिवसेनेला आपली पसंती दिली असली तरी गेल्या निवडणुकीत मनसेने चांगलीच लढत दिली होती. यंदा मात्र शिवसेना विरुद्ध मनसे अशीच लढत या भागात पाहायला मिळण्याची शक्यता असून, योग्य उमेदवार हाच सर्व पक्षांसाठी कळीचा मुद्दा ठरणार
आहे.
२०१२च्या महापालिका निवडणुकीत येथील ७ प्रभागांपैकी ५ ठिकाणी शिवसेना उमेदवारांनी बाजी मारली होती तर दोन ठिकाणी काँग्रेस उमेदवार यशस्वी ठरले होते. गेल्या वेळी लाट असूनही मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. विजयाने मनसेच्या इंजिनाला हुलकावणी दिली असली तरी चार जागांवर मनसेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली तर उर्वरित तीन जागांवर मनसे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या स्थानावर होते. यंदा मनसेची अशी लाट नाही. शिवाय मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हणावा तसा जनसंपर्क ठेवला नसल्याने शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत यंदा येथे पाहायला मिळणार आहे. मनसेची लाट ओसरली असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणे शिवसेनेसमोर यंदा तीव्र मतविभाजनाचा धोका नसणार आहे. तर, काँग्रेसला आपल्या दोन जागा राखताना एमआयएमचा फटका बसणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
मतदारसंघ पुनर्रचना, महिला व अन्य आरक्षणामुळे मात्र वॉर्डातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रत्येक प्रभागात सर्व पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. शिवाय मातब्बर विद्यमान नगरसेवकांनी पर्यायी मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडण्यासाठी शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार आहे.