Join us

शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीचे खबरी

By admin | Published: April 10, 2015 3:35 AM

निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. मात्र अशा बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसणार

नवी मुंबई : निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. मात्र अशा बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसणार नसून बंडखोरांपैकी अनेक जण हे राष्ट्रवादीचे खबरी असल्याचा आरोप, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी केला. ते गुरुवारी बेलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच आपल्यावर पैसे घेऊन उमेदवारी वाटप केल्याचा आरोप करणारे दीड दमडीचे असल्याची टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढण्यासाठी भाजपासोबत युती करून त्यांना ४३ जागा देण्यात आल्या. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांना उमेदवारी मिळू न शकल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे त्यांनी मान्य केले. ते अर्ज मागे घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीत गेलेल्या परशुराम ठाकूर यांनी उमेदवारीसाठी १० लाख रुपये मागितल्याचा आरोप केला होता. याबाबत नाहटांना छेडले असता आरोप करणारेच दीड दमडीचे असून ते राष्ट्रवादीचे खबरी होते, असा पलटवार त्यांनी केला. उपजिल्हाप्रमुख के. एन. म्हात्रे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याबाबत नाहटा यांनी म्हात्रे यांच्या मुलाला जबाबदार धरले. त्यांचा मुलगा अनेक दिवस राष्ट्रवादीच्या संपर्कात होता. त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसल्याने त्यांना उमेदवारी नाकारली, असे त्यांनी सांगितले. घराणेशाहीचे आरोपही त्यांनी खोडण्याचा प्रयत्न केला. ज्या विद्यमान नगरसेवकांची चांगली कामे होती, पुन्हा निवडून येण्याची खात्री होती अशांनाच एकापेक्षा जास्त उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये शिवराम पाटील, नामदेव भगत, विजय चौगुले यांचाही उल्लेख केला.